‘आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना,’ शिंदे समर्थकांची जोरदार पोस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 03:40 PM2022-06-23T15:40:11+5:302022-06-23T15:40:29+5:30
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती अशी काहीशी मनस्थिती झाली होती.
ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती अशी काहीशी मनस्थिती झाली होती. मात्र आता एक एक करुन ठाण्यातील शिवसैनिक एक होत असून त्यांनी शिंदे यांचाच झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे बॅनर, पोस्टर शहरभर लागण्यास सुरवात झाली आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर देखील आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना अशा आशयाचे बॅनर वायरल केल्याने आता ठाण्याची साथ शिंदेंनाच हेच आता यातून दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात शिंदे यांच्या बाजूनं आमदारांची फौज वाढत असल्याने आता ठाण्यातील शिवसैनिकांनी देखील शिंदे यांनाच साथ देण्याचा निर्धार केला आहे. मागील दोन दिवस ठाण्यातील शिवसैनिक देखील एक एक करुन एकमेकांचा कानोसा घेत होते, काहींच्या मनात शिंदे की ठाकरे अशी द्विधामनस्थिती देखील निर्माण झाली होती. परंतु अशांची मने वळविण्याचे काम शिंदे समर्थकांकडून आता यशस्वीपणो केले गेल्याचेच चित्र गुरुवारी ठाण्यात दिसत होते.
काहींनी या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील भेट घेतली आणि शिंदे यांनाच पाठींबा असल्याचे जाहीरपणो सांगितले. तर काही शिंदे समर्थकांनी अनेकांनी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून मन वळविण्याचे काम केल्याचेही बोलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील आता प्रत्येक भागात शिंदे समर्थकांनी बॅनरबाजी सुरु केली आहे. साहेब आम्ही तुमच्या सोबतच.. आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना अशा आशायाचे फलक शहरभर लावले जात आहेत. त्या फलकांवर शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे फोटो दिसत आहेत. मात्र कुठेही उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसून आला नाही. महाविकास आघाडीबरोबरच शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी उघडपणो शिंदे यांना समर्थन जाहीर केले. या पोस्टमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो नाही. त्यांच्याबरोबरच काही माजी नगरसेवकांनीही शिंदे यांना समर्थन देत तसे फलक लावले आहेत. यामुळे जिल्ह्यात शिंदे समर्थकांच्या शक्तीप्रदर्शनाला सुरवात झाल्याचे चिन्ह आहे.
दुसरीकडे शिंदे यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन सुरु केले असतांना त्यावर काही शिवसैनिकांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तुम्ही शिवसेना सोडाल, पण शिवसेना तुम्हाला सोडणार नाही, अशा काही प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर वायरल होत आहे.
कार्यक्रम रद्द
गुरुवारी शिंदे यांच्या समथनार्थ त्यांच्या निवास्थानाबाहेर समर्थक शक्तीप्रदर्शन करणार होते. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. काही शिवसैनिकांर्पयत याची माहिती न पोहचल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे.