सकल मराठा मोर्चाकडून सोमवारी ठाणे "बंद" ची हाक !
By अजित मांडके | Published: September 8, 2023 10:18 PM2023-09-08T22:18:00+5:302023-09-08T22:18:09+5:30
जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत.
ठाणे : जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून राज्य सरकारचा विरोध करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकल मराठा मोर्चाच्या वतीने सोमवारी ठाणे बंद पुकारला आहे.
या संदर्भात ठाण्याच्या शासकीय विश्राम गृह येथे शुक्रवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. या बैठकीत विविध राजकीय पक्षाशी सबंधीत मराठा समाजाच्या संस्था आणि संघटनानी या बंदला पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती सकल मराठा मोर्चाचे ठाणे अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी दिली.
जात, धर्म पक्ष आणि नेता बाजूला ठेवून सर्वांनी या बंदला प्रतिसाद देऊन आपल्या हक्काच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात सकल मराठा मोर्चाच्या वतीने हा बंद पुकारला आहे. शुक्रवारी रात्री ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात सकल मराठा मोर्चाचे ठाणे अध्यक्ष रमेश आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली याबाबत एक बैठक पार पडली. येत्या दोन दिवसात या बंद बाबत प्रत्येक कार्यकर्त्याची गल्लीबोळात, रस्त्यावर बैठक होणार आहे.
ठाणे बंद मध्ये सर्वांनी सहकार्य करून सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येणार आहे. याबाबत रविवारी एका सभागृहात मोठी बैठक ही आयोजित केली जाणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली.