ठाणे स्मार्ट सिटी अद्याप कागदावरच; तीन वर्षांत अवघे १५ प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 02:03 AM2019-12-13T02:03:38+5:302019-12-13T02:04:11+5:30
ठाणे महापालिकेने ५४८० .७० कोटींचा स्मार्ट सिटीचा जम्बो आराखडा तयार करून ४२ प्रकल्पांचा समावेश केला होता.
- अजित मांडके
ठाणे : ठाणे महापालिकेची २०१६ मध्ये स्मार्ट सिटीत निवड झाल्यानंतर या शहरासाठी तब्बल ४२ प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी ५४८०.७० कोटींचा प्रकल्प अहवाल मंजूर केला आहे. यातील ३५ प्रकल्प स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत घेतले असून १५ प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेच्या स्मार्ट सिटी लि. कंपनीने केला आहे. यावर ५२.४० कोटींचा खर्च केला असून पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये अर्बन रेस्टरूमचाच अधिकचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे. मात्र ते सुद्धा अद्याप कार्यान्वित झालेले नाहीत. या उलट नवीन रेल्वे स्थानक, कोपरी सॅटिस, वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे मागील कित्येक वर्षांपासून ज्या स्थितीत होती, त्याच स्थितीत असल्याची धक्कादायक बाब यातून समोर आली आहे.
ठाणे महापालिकेने ५४८० .७० कोटींचा स्मार्ट सिटीचा जम्बो आराखडा तयार करून ४२ प्रकल्पांचा समावेश केला होता. त्यानुसार ठाणे महापालिकेची २५ जून २०१६ रोजी स्मार्ट सिटीत निवड झाली. पालिकेला याअंतर्गत टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त झालेला आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य शासन आणि महापालिकेचा असा मिळून ४९४ कोटींच्या निधीचा समावेश आहे. परंतु, सुरवातीला आलेल्या निधीचा विनियोगच न झाल्याने राज्य शासनाने पालिकेला खडेबोल सुनावले होते.
राज्य शासनाने कान टोचल्यानंतर महापालिकेने कामांची वर्गवारी करून कामांना सुरुवात केली. त्यानुसार परिसर विकासात १० तर शहर विकासात ६ प्रकल्पांचा समावेश केला आहे. ठाणे स्टेशन परिसरात म्हणजेच १ हजार एकरमध्ये मासुंदा आणि कचराळी तलाव येत असून त्यांचा कायापालट केला जाणार आहे. तसेच एलईडी लाईट, वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट, बहुमजली पार्किंग सुविधा, पूर्वेकडील सॅटिस, सॉफ्ट मोबिलिटी मध्ये पादचारी आणि सायकलसाठी वेगळी लेन, सॉलिड वेस्ट आणि सिव्हरेज वेस्टसाठी डिसेंट्रलाईज प्लान्ट, सोलार एनर्जी, वॉटर मीटरिंग, आदी सुविधांसह इतर पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
नव्या ठाणे रेल्वे स्टेशनचा विकासही या माध्यमातून केला जाणार आहे. तीनहातनाक्याजवळील सिग्नल यंत्रणेत बदल, क्लस्टर डेव्हलप्मेंट आदींचा समावेश केला आहे. त्यानुसार नवीन ठाणे स्टेशनसाठी - २८९ कोटी, सॅटिस इस्ट - २६७ कोटी, तीनहातनाका ग्रेड सेपरेटर - २३९ कोटी, क्लस्टर डेव्हल्पमेंट - (किसनगर, राबोडी आणि कोपरी) - ३९७४ कोटी, लेक फ्रन्ट डेव्हल्पमेंट - ३ कोटी, वॉटर फ्रन्ट डेव्हलपमेंट - २२४ कोटी यामध्ये पूर्वीचा सिडको ते साकेतपर्यंतचा हा प्रकल्प आता कळवा शास्त्रीनगरपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
महिला व बालकांच्या सुरक्षेसह ठाणेकरांसाठी महत्त्वाची असलेली कामे यात केली जाणार आहेत. २४ तास पाणीपुरवठा, एलईडी लाईट्स - २७ कोटी, सीसीटीव्ही आणि वायफाय - ४२ कोटींचा खर्च केला जाणार आहे. तसेच टीएमटीसाठीचे व्हेअर इज माय बस अॅप, आॅनलाईनच्या सुविधा ठाणेकरांसाठी, डीजी कार्ड, स्मार्ट मीटरींग आदींची कामे केली जाणार आहेत. तसेच सोलार एनर्जीचीही कामे केली जाणार आहेत.
सध्याच्या घडीला ४२ पैकी ३५ प्रकल्प हे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सुरू असून त्याचा खर्च हा ११७.४५ कोटी एवढा आहे. त्यानुसार सद्यस्थितीत १५ प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांची रक्कम ५२.४० कोटी एवढी आहे. तर २३ प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून त्यांची रक्कम १२०१.३० कोटी इतकी आहे. तर ४ प्रकल्पांचे काम प्रत्यक्षात सुरू होणे शिल्लक असल्याचे त्याची रक्कम ही तब्बल ४२२७ कोटी आहे.
एकूण प्रकल्पांची आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चाची माहिती
दोन कामांसाठीच होणार ४२१३ कोटींचा खर्च
स्टेशन परिसराच्या एक हजार एकराचा विकास करण्यासाठी पालिका आता त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच आराखडा तयार करीत असून यामध्ये सर्व बाबींचा यात विचार केला जाणार असून क्लस्टरचा विकास करतांना कमीत कमी ८ हजार स्वेअर ते १० हजार स्वेअर मीटरच्या एरीयाची विभागणी करून विकास केला जाणार आहे. परंतु, अद्यापही त्याचे काम सुरू झालेले नाही. तर तीनहातनाका परिसराची वाहतूककोंडी सोडविण्यासाठीच्या उपाय योजनांचे कामही शिल्लक आहे. या दोन कामांसाठीच तब्बल ४२१३ कोटींचा खर्च केला जाणार आहे.
सुरू असलेले प्रकल्प
स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांबरोबरच १९ प्रकल्पांची कामे हाती घेतल्याचा दावा केला जात आहे. नवीन ठाणे स्टेशन आणि कोपरी सॅटिसचे काम केवळ १ टक्काच झाले आहे. गावदेवी भूमिगत पार्किंग ३.०४ टक्के, पाण्याचे रिमॉडेलिंग ३.००, पादचारी सुविधा ५.००, मल्टीमोडल ट्रान्झिट हब २.००, सिव्हेरज सिस्टम १.५०, मासुंदा लेक फ्रन्ट (ग्लास फुटपाथ) १.००, पारसिक चौपाटी २७ टक्के, नागला बंदर चौपाटी ५.००, कावेसर-वाघबीळ, कोलशेत चौपाटी ५.००, स्मार्ट मीटरींगचे काम ३१ टक्के काम झाले आहे. सीसी कॅमेऱ्यांचे काम ४८ टक्के, तर १० एमडब्ल्यू सोलर रुफटॉफचे काम २० टक्के झाले आहे.
पूर्ण झालेले प्रकल्प
स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत १५ प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. यामध्ये १० अर्बन रेस्ट रूमचा समावेश आहे. आता त्याचा वापर सुरू आहे किंवा नाही, याचे उत्तर सध्या पालिकेकडे नाही. किंबहुना त्याचा शुभारंभ अद्यापही झालेला नाही.
काही रेस्टरूम धूळखात पडले असून यावर केलेला कोट्यवधीचा खर्च वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. याशिवाय मासुंदा तलावाच्या सुशोभिकरणाचे काम १०० टक्के झाल्याचे बोलले जात असले तरी आजही येथे काम सुरू असल्याचे दिसत आहे.
कमल तलावाचेही काम १०० टक्के झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर शाळेवर सोलार रुफटॉपचे आणि रस्त्यावरील एलईडी दिव्यांची कामे १०० टक्के झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.