Thane: खाद्यपदार्थांच्या खोक्यातून बनावट मद्याची तस्करी, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: March 22, 2024 09:08 PM2024-03-22T21:08:34+5:302024-03-22T21:10:01+5:30
Thane Crime News: उत्पादन शुल्क ठाणे विभागाने नवी मुंबईतील महापे परिसरात हल्दीराम खाद्यपदार्थांच्या खोक्यात छुप्या पद्धतीने अवैधरीत्या लपवलेल्या विदेशी बनावटीच्या स्कॉचच्या १४६ सीलबंद बाटल्या आणि बीअरच्या ९६ कॅन्सवर छापा टाकून वाहन आणि मद्य मिळून सुमारे १४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा मद्य विक्रीवर लक्ष ठेवून असलेल्या उत्पादन शुल्क ठाणे विभागाने नवी मुंबईतील महापे परिसरात हल्दीराम खाद्यपदार्थांच्या खोक्यात छुप्या पद्धतीने अवैधरीत्या लपवलेल्या विदेशी बनावटीच्या स्कॉचच्या १४६ सीलबंद बाटल्या आणि बीअरच्या ९६ कॅन्सवर छापा टाकून वाहन आणि मद्य मिळून सुमारे १४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महापे भागातील सर्व्हिस रोड, इलेक्ट्रिक झोन टी.सी.सी. इंडस्ट्रियल एरिया या ठिकाणी अवैध मद्य एका टेम्पोतून येणार असल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक डॉ. नीलेश सांगडे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. यावेळी विभागाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना, एका टेम्पोत हल्दीराम खाद्यपदार्थांच्या बॉक्समध्ये विविध ब्रॅन्डचे सीलबंद बनावट विदेशी मद्य ठेवल्याचे आढळले. या बॉक्समध्ये विदेशी मद्याच्या १४८ स्कॉचच्या सीलबंद बाटल्या आणि बीअरच्या ९६ कॅन्स आढळल्या. खाद्यपदार्थांच्या बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून त्यावर सेलोटेप चिकटवली होती. तीनचाकी टेम्पोत भरलेले अवैध मद्य एका मोठ्या टेम्पोत टाकताना ही कारवाई करण्यात आली.