ठाणे स्पोर्टींग क्लबच्या निवडणुकीत अखेर भाजपाच्या मढवींचा वरचष्मा!
By सुरेश लोखंडे | Published: September 19, 2022 06:47 PM2022-09-19T18:47:59+5:302022-09-19T18:50:23+5:30
चुरशीच्या लढतीत एक जागा जास्त जिंकली
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येथील सेंट्रल मैदानावरील स्पोर्टींग क्लब कमिटीची त्रैवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली. निवडणुकीसाठी भाजपाचे शहर उपाध्यक्ष व स्पोर्टींग क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या पॅनलमधील नऊ उमेदवारांपैकी पाच जणांचा विजय झाला. तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे विकास रेपाळे यांच्या पॅनलमधील चार जण विजयी झाले. या स्पोर्टींग क्लबच्या व्यवस्थापकीय कमिटीवर एक जागा जास्त जिंकूण मढवींना त्यांचा वरचष्मा राखता आला आहे.
शंभरव्या वर्षात पदार्पण केलेल्या या स्पोर्टीग क्लबची निवडणूक येथील सेंट्रल मैदानावरील कार्यालयात रविवारी संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान पार पडली. तत्पूर्व या निवडणुकीस अनुसरून व्यवस्थापकीय कमिटी विरोधात धर्मदाय आयुक्तालयाकडे वाद गेला होता. यावेळी मात्र विरोधातील दोन्ही अर्ज फेटाळून लावत निवडणूक घेण्याचे आदेश मिळाले आणि रविवारी ही निवडणूक झाली. यानंतर मतमोजणी रात्री उशिरापर्यंत झाली. या निवडणुकीसाठी १४९ सभासदांना मतदानाची संधी मिळाली होती. त्यापैकी १३८ जणांनी मतदान केले. उर्वरित सभासद तटस्थ राहिले.
या निवडणुकी मढवी व रेपाळे या दोन्ही पॅनलमध्ये प्रत्येकी नऊ जणांनी या निवडणुकीत नशिब अजमावले. यामध्ये मढवी यांनी सर्वाधिक ९४ मते घेऊन विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यांच्या पॅनलमधील व विद्यमान सचिव दिलीप धुमाळ, यांच्यासह किशोर ओवळेकर, योगेश महाजन, सुशिल म्हापुस्कर या पाच जणांचा विजय झाला आहे. तर रेपाळे यांना ८० जणांनी मतदान करून विजयी केले. त्यांच्यासह पॅनलमधील कैलाश दे देवल, श्रावण तावडे, प्रशांत गावंड या चार जणांचा विजय झाला आहे. या स्पोर्टींग क्लबच्या व्यवस्थापकीय कमिटीवर विजयी झालेल्या नऊ जणांमधून आता अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे ठाणेकरांचे लक्ष लागून आहे.