परीक्षेच्या तणावामुळे 'तो' घरातून पळाला; दोन दिवस राहिला रेल्वे स्टेशनवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 11:52 PM2018-10-29T23:52:46+5:302018-10-30T06:40:35+5:30
दहावीच्या परीक्षेचा तणाव आणि त्यामुळे खेळायलाही मिळत नसल्याच्या कारणाने शाळेतून बेपत्ता झालेला साहिल राणे (१५) ठाणे रेल्वेस्थानकात सापडला आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : दहावीच्या परीक्षेचा तणाव आणि त्यामुळे खेळायलाही मिळत नसल्याच्या कारणाने शाळेतून बेपत्ता झालेला साहिल राणे (१५) ठाणे रेल्वेस्थानकात सापडला आहे. पंजाबमध्ये असलेल्या बहिणीने त्याची समजूत घातल्यानंतर तो शनिवारी सुखरूप घरी परतल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.
वागळे इस्टेट परिसरात राहणारा साहिल २५ आॅक्टोबर रोजी सकाळी नौपाड्यातील शाळेत परीक्षेसाठी गेला होता. पेपर झाल्यानंतर दुपारी तो घरी परतणे अपेक्षित होते. पण, तो घरी परतलाच नाही. तो ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-६ वर रेंगाळत राहिला. इकडे त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही तो न सापडल्याने अखेर त्याच्या अपहरणाची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी दाखल केली. दरम्यान, परीक्षेच्या टेन्शनमुळे आपण घराबाहेर पडल्याचा मेसेज त्याने मोहाली, पंजाबमधील बहिणीला व्हॉट्सअॅपवरून केला. या मेसेजवरून बहिणीने फोन करून त्याची समजूत घातली. हा प्रकार त्याचे वडील महेश राणे यांना समजल्यानंतर त्यांनी त्याला ठाणे रेल्वे स्थानकातून घरी आणले.
दोन दिवस पाण्यावरच
साहिल घराबाहेर पडल्यानंतर त्याने दोन दिवस ठाणे रेल्वेस्थानक परिसरात फिरून काढले. या काळात त्याच्याकडे मोजकेच पैसे असल्याने तो केवळ पाण्याची बाटली विकत घेऊ शकला. फक्त पाण्यावरच दोन दिवस काढल्याचे त्याने चौकशीत सांगितले.