ठाणे जिल्हाभरात गावठी दारूच्या अड्डयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र, दारूसह २६ लाखांचा ऐवज नष्ट
By जितेंद्र कालेकर | Published: June 23, 2024 07:38 PM2024-06-23T19:38:02+5:302024-06-23T19:38:56+5:30
Thane News: ठाणे जिल्हयातील समुद्राच्या खाडीतील तिवरांच्या झुडूपामध्ये चालणाऱ्या गावठी दारुच्या अड्डयांवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी व्यापक धाडसत्र राबविले. या धाडीत उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह १३० अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - ठाणे जिल्हयातील समुद्राच्या खाडीतील तिवरांच्या झुडूपामध्ये चालणाऱ्या गावठी दारुच्या अड्डयांवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी व्यापक धाडसत्र राबविले. या धाडीत उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह १३० अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यामध्ये गावठी दारुसह २६ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
हातभट्टी दारुचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ठाणे जिल्हाभरात २२ जून २०२४ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त सूर्यवंशी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. प्रदीप पवार, ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे आणि उपअधीक्षक डॉ. वैभव वैद्य यांच्या नियंत्रणाखाली १३० अधिकारी कर्मचारी यांची विविध पथके तयार केली हाेती. याच पथकांमध्ये डॉ. सूर्यवंशी यांनी स्वत: सक्रीय सहभाग घेतला. अलिमघर, दिवा, खर्डी, छोटी देसाई, मोठी देसाई, मानेरे गाव, कालवार, भिवंडी, कोरावळे, शहापूर, कुंभालीर् या ठाणे तसेच रायगड जिल्हयात हातभट्टी निर्माण करणाऱ्या गावांमधील निर्मिती ठिकाणांवर धाड टाकून ती उद्धवस्त केली.
या कारवाई दरम्यान मुंबई, ठाण्यातील भरारी पथकांसह सात विविध पथकांची निर्मिती केली होती. ठाणे जिल्हयातील या कारवाईमध्ये २३ बेवारस तर एका वारसदार असलेल्या ठिकाणांसह २४ अड्डयांवर धाडसत्र झाले. यात २४ गुन्हे दाखल झाले असून ५९५ लीटर हातभट्टीची दारु आणि गावठी दारुच्या निर्मितीसाठी लागणारे ६९ हजार २०० लीटर रसायन आणि इतर सामुग्री असा २६ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
आयुक्तांसह अधीक्षकांनी बोटींमधून केले धाडसत्र
कोकण विभागीय आयुक्त डॉ. प्रदीप सूर्यवंशी आणि ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी तीन वेगवेगळया बोटींमधून धाडसत्र राबवून
अलिमघर, दिवा, अंजूर खाडीतील हातभट्टी निर्मितीची ठिकाणे उद्धवस्त केली. याच कारवाईमध्ये रायगड जिल्हयातील पथकानेही आठ गुन्हे नोंदवून चार लाख ६७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. यातील फरार झालेल्या आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत तसेच आयपीसी कलम ३२८ आणि एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.