ठाणे जिल्हयात उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत दारुसह २४ लाखांचा माल जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: April 9, 2020 09:12 PM2020-04-09T21:12:36+5:302020-04-09T21:21:31+5:30
दारुची निर्मिती करणाऱ्या ठाणे जिल्हयातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी धाडसत्र राबवून ३९ आरोपींना गेल्या १५ दिवसांमध्ये अटक केली. त्यांच्याकडून मद्याची वाहतूक करणा-या दहा वाहनांसह २४ लाख १९ हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यभर संचारबंदी लागू केलेली आहे. सर्व प्रकारच्या दारुची विक्री आणि निर्मितीही बंद आहे. तरीही या काळात दारुची निर्मिती करणा-या ठाणे जिल्हयातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी धाडसत्र राबवून ३९ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून मद्याची वाहतूक करणा-या दहा वाहनांसह २४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांच्या आदेशाने ठाण्याचे अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी मार्च महिना अखेरीस ते एप्रिलचा पहिला आठवडा या १५ दिवसांच्या कालावधीमध्ये मद्य विक्री आणि निर्मितीप्रकरणी ४४ गुन्हे दाखल करीत २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ठाणे जिल्हयात गावठी दारुची निर्मिती करणारी ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि अंबरनाथ येथील केंद्रे उद्ध्वस्त केली. तसेच बेकायदा मद्यविक्री होणार नाही आणि विषारी मद्यविक्री होऊन कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी जिल्हाभर उत्पादन शुल्क विभागाने गस्त वाढविली. दरम्यान, २३ मार्च ते ८ एप्रिल २०२० या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मद्य विक्री आणि निर्मितीचे ४९ गुन्हे दाखल केले. त्यापैकी ३९ आरोपींना अटक केली आहे. तसेच मद्यवाहतूक करणारी दहा वाहने जप्त केली असून २४ लाख १९ हजार ४९५ इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु विक्री होणार नाही, यासाठी ही कारवाई यापुढेही सुरु राहणार असल्याचे अधीक्षक घुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.