रेझिंग डेच्या निमित्ताने ठाण्यातील विद्यार्थ्यांनी केली पोलिसांशी मैत्री

By जितेंद्र कालेकर | Published: January 2, 2020 09:45 PM2020-01-02T21:45:37+5:302020-01-02T21:53:47+5:30

मुलांनो पोलिसांची भीती बाळगू नका, ते तुमचे मित्र आहेत. पोलीस त्यांची शस्त्रे कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात, हेही जाणून घ्या. ठाणे शहर पोलिसांनी रेझिंग डे च्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना पोलीस खात्याविषयीची माहिती गुरुवारी मोकळेपणाने दिली.

 Thane students make friends with police for Raising Day | रेझिंग डेच्या निमित्ताने ठाण्यातील विद्यार्थ्यांनी केली पोलिसांशी मैत्री

पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली शस्त्रांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली शस्त्रांची माहितीठाणेनगर आणि कोपरी पोलिसांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुलांनो पोलिसांची भीती बाळगू नका, ते तुमचे मित्र आहेत. कोणत्या तक्रारी पोलिसांकडे करायच्या, कोणत्या इतर विभागाकडे, याचीही माहिती घ्या. पोलीस त्यांची शस्त्रे कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात, हेही जाणून घ्या, आदींची माहिती अगदी गप्पांच्या ओघात ठाणे शहर पोलिसांनी गुरुवारी विद्यार्थ्यांना दिली. निमित्त होते पोलीस रेझिंग डे चे.
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते २ जानेवारी १९६० रोजी महाराष्टÑ पोलीस दलाला त्यांचा स्वतंत्र ध्वज देण्यात आला. तेव्हापासून हा दिवस ‘रेझिंग डे’ म्हणून साजरा होतो. ठाणे पोलीस आयुक्तालयातही दरवर्षीप्रमाणे यंदाही २ ते ५ जानेवारी २०२० दरम्यान हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी २ जानेवारी रोजी यानिमित्त पोलीस स्कूलच्या आठवी ते नववीपर्यंतच्या सुमारे ६० विद्यार्थ्यांना गटागटांनी पोलीस यंत्रणेची माहिती दिली. यात पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते? ठाणे अंमलदार, मुद्देमाल याबाबतची माहिती तसेच एसएलआरपासून अश्रुधुराच्या नळकांड्यांपर्यंतच्या शस्त्रास्त्रांचीही माहिती त्यांनी मोकळेपणाने दिली. जमाव नियंत्रणापलीकडे गेल्यानंतर त्यावर थेट लाठीचार्ज किंवा गोळीबार करण्यापेक्षा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी गॅसगनचा कसा उपयोग केला जातो. याशिवाय, नाइन एमएम पिस्तूल, कार्बाईन, सेल्फ लोडेड रायफल (एसएलआर) आदी आधुनिक शस्त्रांचीही माहिती विद्यार्थ्यांनी पोलीसकाकांकडून जाणून घेतली. सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक पूनम ढवळे या अधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
एखादी तक्रार द्यायची झाल्यास पोलीस ठाण्यात यायला घाबरू नका. तक्रारींचे निराकरण केले जाईल. निष्कारण पोलिसांची भीती बाळगू नका. मोबाइल, पाकीटचोरी परिसरातील हाणामारी किंवा छेडछाडीची तक्रार कशी द्यायची, याचेही त्यांनी समुपदेशन केले. मुलींनीही कशा प्रकारे सावधानता बाळगली पाहिजे. ओळखीतूनही कधीकधी कसे गैरप्रकार केले जातात, याचीही त्यांनी माहिती दिली. याशिवाय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी आणि सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी गुरुवारी दुपारी जोशी-बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा आणि सायबर गुन्हे याविषयी मार्गदर्शन केले. असाच उपक्रम कोपरी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर यांनीही राबविला. नाखवा हायस्कूलच्या सुमारे ५५ विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कामकाजाची माहिती घेतली.

Web Title:  Thane students make friends with police for Raising Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.