सागरी ३६ किलोमीटर अंतर केवळ ११ तासांत पोहून करणार विक्रम
By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 23, 2024 05:04 PM2024-01-23T17:04:30+5:302024-01-23T17:06:47+5:30
ठाणे जिल्ह्यातील ११ जलतरणपट्टू रिले पद्धतीने पोहणार.
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे :ठाणे येथील ११ जलतरणपट्टू धरमतर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे रीले पद्धतीने ३६ किलोमीटर सागरी अंतर, भारताचा प्रजासत्ताकदिन व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अरबी समुद्रातील धरमतर जेट्टी येथून सुरुवात करून गेटवे ऑफ इंडिया येथे पोहून पार करण्याचा निश्चय केला आहे. २७ जानेवारी २०२४ रोजी अरबी समुद्रातील धरमतर जेट्टी येथे झेप घेऊन गेटवे ऑफ इंडिया येथे ११ तासांत पोहून पार करण्याचा प्रयत्न करणार असून प्रत्येक जलतरणपट्टू एक तास ह्या पद्धतीने पोहणार आहेत.
हा उपक्रम महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना ह्या राष्ट्रीय मान्यताप्राप्त जलतरण संस्थेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार व नियमानुसार घेण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या प्रमुख माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आरती प्रधान आहेत. ‘इंग्लिश चैनल’ आणि इतर ‘आंतरराष्ट्रीय ओपन सी’ चे लक्ष्य ठेवणाऱ्या जलतरण पट्टूंची ही सुरुवातीची पायरी आहे. उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून ह्या मध्ये सहभागी होणारे तरुण जलतरण पट्टू अभिर सालस्कर - १० वर्ष, स्वराज स्नेहा गौरव फडणीस - १० वर्ष, अद्या म्हात्रे - १० वर्ष, अमृता क्षीरसागर - १२ वर्ष, शार्दुल सोनटक्के – १२ वर्ष, वंशिका अय्यर - १२ वर्ष, रुद्र शिराली - १३ वर्ष, रोहन राणे – १३ वर्ष, कनाद कुलकर्णी - १४ वर्ष, सावीओला मस्करेहन्स – १६ वर्ष, करण नाईक – १८ वर्ष असे आहे.
तरुण जलतरणपटूंना खुल्या समुद्रीय लांब पल्याच्या जलतरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य प्राप्त होण्याचे उद्दिष्ट प्राप्त व्हावे. ह्यात सहभाग घेणारे स्पर्धक सर्वपरिचित प्रशिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कै. श्री. रामचंद्र ठाकूर जलतरण तलाव ठाणे येथे प्रशिक्षण घेत आहेत. शनिवार २७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १:१५ वाजता पोहणे सुरू होईल आणि जलतरणपटूंनी दुपारी अंदाजे १२:१५ पर्यंत अंतिम रेषा पार करणे अपेक्षित आहे असे आयोजकांनी सांगितले.