राज्यस्तरीय ढोलकी स्पर्धेत ठाण्याचा तेजस मोरे ठरला द्वितीय पारितोषिकाचा मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 11:35 AM2019-04-03T11:35:41+5:302019-04-03T12:00:40+5:30
सांगली येथे पार पडलेल्या ढोलकी बहाद्दर तानाजी वाडकर स्मृती ढोलकी वादन राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याचा सुपूत्र आणि ठाणेकर रहिवासी बाल ढोलकीपटू व प्रख्यात ढोलकीवादक कृष्णाजी घोटकर यांचे शिष्य तेजस पुंडलिक मोरे हा दुसर्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
ठाणे - सांगली येथे मंगळवारी (2 एप्रिल) पार पडलेल्या ढोलकी बहाद्दर तानाजी वाडकर स्मृती ढोलकी वादन राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याचा सुपूत्र आणि ठाणेकर रहिवासी बाल ढोलकीपटू व प्रख्यात ढोलकीवादक कृष्णाजी घोटकर यांचे शिष्य तेजस पुंडलिक मोरे हा दुसर्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. स्पर्धेत सुरुवातीपासूनच तेजस मोरे याने आपल्या ढोलकीतील स्वरतरंगांनी रसिकांची मनं जिंकली होती. तेजस याला स्मृतिचिन्ह व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील भावे नाट्यमंदिर येथे ढोलकीसम्राट पैगंबरवासी यासीन म्हाब्री यांचे शिष्य ढोलकी बहाद्दर तानाजी वाडेकर स्मृती राज्यस्तरीय खुली ढोलकीवादन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक ढोलकीपटू देखील सहभागी झाले होते. ठाण्यात राहणारा सुधागड तालुक्याचा सुपूत्र व सुप्रसिध्द ढोलकीपटू कृष्णाजी घोटकर यांचा शिष्य बाल ढोलकीपटू तेजस मोरे याने सह्याद्री वाहिनीवरील ‘ढोलकी झाली बोलकी’ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. तसेच ठाण्यातील दैनिक जनादेश गौरव पुरस्कारानेही त्याला गौरविण्यात आले होते. तर नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापौर भजन स्पर्धेतही तेजस मोरे हा अव्वल ठरला होता. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांनी देखील तेजसच्या कलेचे खूप कौतूक केले आहे.
अवघ्या 13 व्या वर्षात ढोलकीवादनातील 12 प्रकार आत्मसाद करणार्या तेजस मोरे याने ठाणे, मुंबई, आळंदी, पंढरपूर येथील ढोलकी स्पर्धांमध्येही आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. ढोलकी सम्राट तानाजी वाडेकर यांचे चिरंजीव संदीप वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या ढोलकीवादन स्पर्धेत सुरुवातीपासूनच तेजस मोरे याने आपल्या ढोलकीतील स्वरतरंगांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. अंतिम फेरीत तेजस मोरे दुसर्या स्थानावर विजेता ठरला. यावेळी परिक्षक म्हणून मुंबईतील सुप्रसिद्ध ढोलकीवादक नवीनभाई शर्मा व संजय साळुंके यांनी काम पहिले. यावेळी द्वितीय विजेता तेजस मोरे यास स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले आहे.