Thane: ठाणेकरांना अवघ्या १० रुपयात करता येणार वातानुकुलीत बसमधून प्रवास
By अजित मांडके | Published: February 17, 2023 04:19 PM2023-02-17T16:19:31+5:302023-02-17T16:20:07+5:30
Thane News: ठाणेकरांच्या सेवेत येत्या जुलै अखेर पर्यंत १२३ इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहे. इलेक्ट्रीक वातानुकुलीत बस सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवास भाडे कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
- अजित मांडके
ठाणे : ठाणेकरांच्या सेवेत येत्या जुलै अखेर पर्यंत १२३ इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहे. परंतु इतर प्राधिकरणांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी परिवहनने आता इलेक्ट्रीक वातानुकुलीत बस सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवास भाडे कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाणेकर प्रवाशांना अवघ्या १० रुपयात एसीचा गारेगार प्रवास करता येणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्यासाठी एसी बसचे भाडे हे २० रुपये होते. परंतु आता त्यासाठी १० रुपये मोजावे लागणार आहे. तर बोरीवली पर्यंत जाणाºया प्रवाशांना यापूर्वी ८५ रुपये मोजावे लागत होते. आता त्यासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.
परिवहनच्या ताफ्यात येत्या काळात १२३ इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. पैकी ४५ स्टॅण्डर्ड बस व २६ मिडी बस अशा एकूण ७१ बस वातानुकुलीत तसेच १० स्टॅण्डर्ड व ४२ मिडी बस अशा एकूण ५२ साध्या बस उपलब्ध होणार आहेत. यातील एकूण वातानुकुलीत २६ मिडी बस शहरातंर्गत व उर्वरीत ४५ स्टॅण्डर्ड बसपैकी काही बस ठाणे शहराबाहेरील दिर्घ पल्याच्या मार्गावर घाटकोपर, बोरीवली, नवीमुंबई, पनवेल आदी मार्गावर चालविण्याचे नियोजन आहे.
परंतु ठाणे शहरात बेस्ट मार्फत चालविण्यात येत आहेत. त्यांचे तिकीट दर मात्र परिवहन पेक्षा कमी आहेत. त्यात बेस्ट व नवीमुंबई महापालिका परिवहन उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या वातानुकुलीत बसचे तिकीट दर ही कमी केलेले आहेत. त्या उपक्रमांशी स्पर्धा करावयाची झाल्यास अधिकाधिक प्रवासी उत्पन्न प्राप्त करुन घ्यायचे झाल्यास ठाणे परिवहनचे तिकीट दर देखील कमी करणे अभिप्रेत आहे. त्यानुसार इलेक्ट्रीक बस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर त्या बसचे तिकीट दर हे कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शुक्रवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्याचे भाडे (इलेक्ट्रीक वातानुकुलीत बसचे) १० रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. यापूर्वी यासाठी २० रुपये मोजावे लागत होते. तर बोरीवली पर्यंतचे भाडे ८५ ऐवजी ५० रुपये असणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास लवकरच गारेगार होणार आहे.
व्होल्वो बसचे तिकीट दरही होणार कमी
परिवहनच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस दाखल झाल्यानंतर या बसचे तिकीट दर कमी असणार आहे. परंतु परिवहनच्या ताफ्यात सध्या असलेल्या ३० व्होल्वो अर्थात एसी बसचे भाडे हे अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होऊ शकते. ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक बस दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत व्होल्वो बसचे प्रवासी भाडे देखील इलेक्ट्रीक बस प्रमाणे समान करता येणार आहे.
किलोमीटर - सध्याचे भाडे - प्रस्तावित भाडे
० ते २ किमी - २० रुपये - १० रुपये
२ ते ४ - २५ - १५
४ ते ६ - ३० - १५
८ ते १० - ४० - २०
१० ते १२ - ५० - २०
२८ ते ३० - ८५ - ५०
३८ ते ४० - १०५ - ६५