उलथापालथीचा केंद्रबिंदू असलेले ठाणेच कळीचा मुद्दा, CM पद ठाण्याकडे टिकून राहणार का? कमालीची उत्सुकता
By संदीप प्रधान | Published: October 16, 2024 10:27 AM2024-10-16T10:27:12+5:302024-10-16T10:28:06+5:30
आता विधानसभा निवडणुकीत ठाण्यात शिंदेसेनेला मतदारांचा कौल कसा प्राप्त होतो, यावरच मुख्यमंत्रिपद ठाण्याकडे टिकून राहणार किंवा कसे, हे ठरणार आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे हाच कळीचा मुद्दा राहणार आहे.
ठाणे : महाराष्ट्रात अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीचा केंद्रबिंदू ठाणे जिल्हा होता. एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांसह शिवसेनेत ‘उठाव’ केल्याने महाविकास आघाडी सत्तेतून बाहेर गेली व महायुतीची सत्ता स्थापन झाली. ठाण्याकडे मुख्यमंत्रिपद खेचून आणण्यात शिंदे यशस्वी ठरले. शिवसेनेला सत्ता दाखवणाऱ्या ठाण्यातील जवळपास सर्व आमदार शिंदे आपल्यासोबत घेऊन गेले. आता विधानसभा निवडणुकीत ठाण्यात शिंदेसेनेला मतदारांचा कौल कसा प्राप्त होतो, यावरच मुख्यमंत्रिपद ठाण्याकडे टिकून राहणार किंवा कसे, हे ठरणार आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे हाच कळीचा मुद्दा राहणार आहे.
जिल्ह्यात विधानसभेचे १८ मतदारसंघ असून मुंबई पाठोपाठ सर्वाधिक मतदारसंघ असलेला जिल्हा आहे. ठाणे (शहर) संजय केळकर (भाजप), कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे (शिंदेसेना), ओवळा-माजिवडा प्रताप सरनाईक (शिंदेसेना), मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड (शरद पवार गट), मीरा भाईंदर गीता जैन (भाजप पुरस्कृत अपक्ष), डोंबिवली रवींद्र चव्हाण (भाजप), कल्याण पूर्व गणपत गायकवाड (भाजप), कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर (शिंदेसेना), कल्याण ग्रामीण राजू पाटील (मनसे), उल्हासनगर कुमार आयलानी (भाजप), अंबरनाथ बालाजी किणीकर (शिंदेसेना), मुरबाड किसन कथोरे (भाजप), शहापूर दौलत दरोडा (अजित पवार गट), भिवंडी पूर्व रईस शेख (सपा), भिवंडी पश्चिम महेश चौघुले (भाजप), भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे (शिंदेसेना), ऐरोली गणेश नाईक (भाजप), बेलापूर मंदा म्हात्रे (भाजप) असे निवडणुकीत ठाणे जिल्ह्याचे चित्र आहे. स्वत: शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पाच आमदार शिंदेसेनेत गेले. ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर शिंदे यांची मजबूत पकड असल्याने शिंदे यांनी बंड केल्यावर त्यांचा विरोध पत्करून जिल्ह्यात राजकारण करणे अशक्य असल्याने सर्व आमदारांनी शिंदे यांची कास धरली.
मातब्बर आमदार सत्तेबाहेर
जिल्ह्यात आठ आमदार हे भाजपचे आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर संख्याबळात शिंदेसेनेपेक्षा दुप्पट असलेल्या भाजपची सत्ता आली. परंतु जिल्ह्यात भाजपचे इतके आमदार असूनही मंत्रिपद केवळ रवींद्र चव्हाण यांनाच मिळाले.
संजय केळकर, किसन कथोरे, गणेश नाईक यांच्यासारख्या मातब्बर आमदारांना सत्तेबाहेर रहावे लागले. त्यामुळे सत्ता येऊनही भाजपला ठाणे जिल्ह्यात फारसा लाभ झाला नाही.
सरकारच्या माध्यमातून शिंदे यांनी जिल्ह्यात आणलेला हजारो कोटींचा निधी हा मुख्यत्वे शिंदेसेनेच्या आमदारांना प्राप्त झाला. त्या तुलनेत भाजपच्या आमदारांना निधी मिळाला नाही.
स्वबळाचा नारा यंदा चालणार का?
- माजी खासदार कपिल पाटील व किसन कथोरे, गणेश नाईक व मंदा म्हात्रे अशा नेत्यांच्या वादंगामुळे भाजप पोखरला गेला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाणे व कल्याण हे दोन्ही मतदारसंघ शिंदेसेनेनी राखले. मात्र पाटील-कथोरे वाद व अन्य कारणास्तव भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपने गमावला.
- मनसेचा एकुलता एक आमदार राजू पाटील यांच्या रुपाने मागील वेळी विजयी झाला. स्वबळाचा नारा देणारे राज ठाकरे ठाणे जिल्ह्यात किती मतदारसंघात उमेदवार देणार व ते कुणाची मते खाणार, यावर येथील निकाल अवलंबून राहील.