Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
By जितेंद्र कालेकर | Published: October 4, 2024 10:00 PM2024-10-04T22:00:32+5:302024-10-04T22:01:17+5:30
Thane Crime News: काेपरीतील बांधकाम व्यावसायिक स्वयम परांजपे याच्या डाेक्यावर आणि पाठीवर काेयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून करणाऱ्या मयुरेश नंदकुमार धुमाळ याला तसेच त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
-जितेंद्र कालेकर
ठाणे - काेपरीतील बांधकाम व्यावसायिक स्वयम परांजपे (३५, रा. संचार सोसायटी, अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे) याच्या डाेक्यावर आणि पाठीवर काेयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून करणाऱ्या मयुरेश नंदकुमार धुमाळ (२४, रा. जांभळी नाका, ठाणे) याला तसेच त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतल्याची माहिती काेपरी पाेलिसांनी शुक्रवारी दिली. आपल्या मैत्रिणीला ताे काही अश्लील फाेटाेंच्या आधारे ब्लॅकमेल करीत असल्यामुळे त्याचा खून केल्याचे त्याने प्राथमिक चाैकशीत सांगितल्याचे पाेलिसांनी सांगितले.
काेपरीतील संचार साेसायटीत स्वयम यांचा खून झाला, त्यावेळी आराेपी मयुरेश हाही त्याठिकाणी हाेता. त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. काेपरीतील चेंदणी काेळीवाडा भागात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीसाेबत २८ एप्रिल राेजी एका लग्न समारंभात स्वयम याची ओळख झाली हाेती. याच ओळखीचा फायदा घेत त्याने तिला कारमध्ये बसवून फिरायला जाऊ, असे सांगून पाण्यातून गुंगीचे औषध दिले हाेते. तिने ते प्यायल्यानंतर ताे तिला घरी घेऊन गेला हाेता. त्यावेळी त्याने या तरुणीचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढले होते. त्यानंतर ताे तिला ‘भेटायला ये’ असे मेसेज करून कायम ब्लॅकमेल करीत होता. हीच माहिती तिने तिचा जांभळी नाका भागात राहणारा मित्र मयुरेश याला दिली हाेती. त्यानंतर ही तरुणी आणि मयुरेश यांनी स्वयम याला तिचे काढलेले फोटो डिलीट करण्यास समजावून सांगितले. मात्र, यातूनच त्यांच्यात ४ ऑक्टाेबर राेजी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्वयम आणि मयुरेश यांच्यात चांगलाच वाद झाला.
याच वादातून स्वयम याच्यावर काेयत्याने डोक्यावर वार करून त्याचा खून केल्याची कबुली मयुरेश याने पाेलिसांना दिली. या प्रकरणामध्ये मयुरेश आणि त्याची मैत्रीण या दाेघांनाही ताब्यात घेतले असून त्यांना अटक केली जाणार असल्याचे काेपरी पाेलिसांनी सांगितले. मयुरेश याने स्वयम याच्यावर काेयत्याचे ४० ते ५० वार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.