Thane: वंचितांच्या रंगमंचावर वस्त्यांमधील मुलांनी मांडले वास्तव
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 26, 2022 05:10 PM2022-12-26T17:10:48+5:302022-12-26T17:11:11+5:30
Thane: पुन्हा एकदा वंचितांच्या रंगमंचावर शहरातील वस्त्यावस्त्यामधील मुलांनी वास्तवावर आधारीत नाटीका सादर केल्या. यावर्षी बोध जुना – शोध नवा या थीमवर आधारित नाटिका सादर झाल्या.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - पुन्हा एकदा वंचितांच्या रंगमंचावर शहरातील वस्त्यावस्त्यामधील मुलांनी वास्तवावर आधारीत नाटीका सादर केल्या. यावर्षी बोध जुना – शोध नवा या थीमवर आधारित नाटिका सादर झाल्या. लहानपणी ऐकलेल्या बोध कथांना आजच्या काळाचा संदर्भ घेऊन त्यांनी नाटीका सादर करुन वास्तवदर्शी चित्र निर्माण केले.
समता विचार प्रसारक संस्था आयोजित वंचितांच्या रंगमंचाच्या नाट्यजल्लोषाचे नववे पर्व साजरे होत आहे. त्यानिमित्ताने कळवा गटाने एका ‘ल बोयाज वेर्स मुआ या फ्रें’ बोधकथेवर आधारित आई मुलगा संबंधावर सुंदर नाटिका सादर केली. राबोडी म्यूनिसिपल शाळेच्या नववीच्या मुलींनी ‘हिंसा के खिलाफ आवाज उठाओ’ ही मुली आणि मुले यांच्यावर होणार्या शारिरीक, लैंगिक आणि मानसिक हिंसेबद्दल मुलांना जागृत करणारी नाटिका, रमाबाई आंबेडकर नगरमधील मुलांनी नाकतोडा आणि मुंग्या या बोधकथेवर आधारित मेहनतीचे महत्व सांगणारी, कशेळी गटाने ‘नो मोअर सायलंस’ ही मुलींची छेड छाड करणार्यांविरुद्ध मुलींनी गप्प न बसता त्याला प्रतिकार करावा हे प्रभावीपणे सांगणारी या नाटीका सादर केल्या. मानपाडा गटाने धावती लोकल या नावाने सादर केलेल्या नाटिकेमध्ये अपयशाने निराश न होता अप्रामाणिक मार्गाचा अवलंब न करता सातत्याने प्रामाणिकपणे मेहनत केली तर यश नक्कीच मिळते हे उत्तमरित्या सादर केले. घणसोली गटाने क्लिक या नाटिकेत मोबाइलमधील ज्ञानावर प्रत्यक्ष वाचन आणि अनुभवाने मिळवलेल्या ज्ञानापेक्षा जास्त भरोसा ठेवणे बरे नव्हे हे पटवून दिले.
किसननगरच्या लहान मुलांनी पंचतंत्र मधील दोन गोष्टी नाट्यरूपात सादर केल्या. मनोरमा नगर गटाने कमी मेहनत करून झटपट यश मिळवण्यामागे लागून अपयश येताच व्यसनाधीन होणार्या तरुणाची गोष्ट सांगणारी कधी हा कधी ना ही नाटिका, राबोडी येथील दहावीच्या वर्गातील मुलांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ही मुलींना सुद्धा शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे हे अधोरेखित करणारी नाटिका सादर केली. येऊर गटाने मुलींना सुद्धा खेळांमध्ये सहभाग घेता आला पाहिजे, त्यासाठी पालकांनी मुलींना मुलांप्रमाणेच खेळात भाग घेण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे हे प्रभावीपणे सादर केले. ठाणे शहर विभागाने परीक्षेत अपयश मिळाल्यास आत्महत्येचा मार्ग अनुसरू नये, पुन्हा जिद्दीने सकारात्मक विचाराने आयुष्याला सामोरे जावे हे एक तरी ओवी अनुभवावी या नावाच्या नटिकेतून व्यक्त केले.