ठाणे : तरुणीची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाला २४ तासांत अटक
By अजित मांडके | Published: October 15, 2022 04:17 PM2022-10-15T16:17:50+5:302022-10-15T16:18:19+5:30
ठाण्यात रिक्षाचालकाने तरुणीची छेड काढल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली होती.
ठाणे : ठाण्यात रिक्षाचालकाने तरुणीची छेड काढल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली होती. या तरुणीने यावेळी विरोध केल्याने तिला त्याने काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यात ती तरुणी जखमी झाली. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत अवघ्या २४ तासाच्या आत दिघा येथून ३६ वर्षीय रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली. दारूच्या नशेत आपण हें कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली.
ठाणे स्टेशन रोड परिसरात शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या कामानिमित्त जात होती. त्या ठिकाणी हा रिक्षाचालक आला. त्या रिक्षाचालकाने तरुणीला इशारे करत तिची छेड काढली. तरुणीने विरोध केला असता या रिक्षाचालकाने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने त्याला पळण्यापासून रोखले. रिक्षाचालक रिक्षात बसून पळत असताना तरुणीने त्याच्या कॉलरला धरून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रिक्षा चालकाने रिक्षा सुरू करून या तरुणीला फरफटत घेऊन गेला. काही वेळा फरफटत गेल्यानंतर तरुणी पडली. या घटनेत तरुणी जखमी झाली. तर रिक्षाचालक पसार होण्यात यशस्वी झाला.
हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी जखमी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे नगर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासा दरम्यान तांत्रिक बाजू तपासून तसेच खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सबंधित रिक्षाचालक हा दिघा येथे राहत असल्याचे उघड झाले. त्यानुसार ठाणे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांच्या पथकाने शनिवारी सकाळी कारवाई करून कटिकादला उर्फ राजु विरांगणेलू (३६) याला दिघा येथून अटक केली. दारूच्या नशेत आपण हें कृत्य केल्याची कबुली संबंधित रिक्षाचालकाने चोकशीत पोलिसांना दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक दुमलवाड करीत आहेत.
#WATCH | Maharashtra: Case filed u/s 354 & 354A at Thane Nagar PS after a 22-yr-old woman was allegedly molested & dragged for a few meters by an auto-rickshaw driver near Thane railway station. Search on for accused: Thane Police (14.10)
— ANI (@ANI) October 14, 2022
(CCTV visuals verified by local police) pic.twitter.com/BAURRUhNGg
कसे पकडले
सीसीटीव्हीमध्ये रिक्षाचा नंबर दिसत नव्हता. पण मागे स्टीलचे गार्ड वगैरे लावले होते. असे गार्ड नवी मुंबई भागात लावलेले दिसतात. आरोपी थोडा जाड आणि चोटी ठेवणारा आहे अशी माहिती मुलीने दिली होती. त्यावरून राजू नावाचा असा रिक्षा चालक आहे अशी माहिती मिळाली. पोलिसांनी दिघा भागात सर्व पार्किंग रिक्षा शोधायला सुरुवात केली. रात्रभर शोध सुरू होता. तेव्हा दिघा भागात अशीच एक गार्डची रिक्षा सापडली. तेव्हा ती रिक्षा पण राजूची असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मग त्याच परिसरात शोध सुरू केला. तेव्हा त्याच्या घरी राजू सापडला, त्याने ताबडतोब कबूल केले की माझी चूक झाली. तसंच लोक मारतील म्हणून पळून गेलो. काल कळव्यातून भाडे घेतले, स्टेशनला भाडे सोडले. तिकडे एक इडली वाला आहे त्याकडे तो थांबलेला, तेव्हा त्याने या मुलीला पाहिले आणि छेड काढली, आणि पुढची घटना घडली, असंही सांगितलं.