ठाणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र पित्याला जन्मठेपेची शिक्षा
By जितेंद्र कालेकर | Published: December 7, 2022 09:19 PM2022-12-07T21:19:55+5:302022-12-07T21:20:59+5:30
ठाणे पोक्सो न्यायालयाचा निकाल, २० हजारांच्या दंडाचीही शिक्षा
ठाणे: आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र पित्याला २० वर्षे सश्रम कारावासाची तसेच २० हजार रुपये दंडाची आणि दंड न भरल्यास २०० दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ठाण्याच्या अतिरिक्त विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष पोक्सो न्यायाधीश वी. वी. वीरकर यांनी बुधवारी ही शिक्षा सुनावली. याशिवाय, धमकी दिल्याप्रकरणीही आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावासासह दोन हजारांच्या दंडाची अतिरिक्त शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
ठाण्यातील दिवा भागात ४ सप्टेबर २०१८ रोजी हा घृणास्पद प्रकार घडला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या आईनेच आपल्या दुसऱ्या पतीविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता. पहिल्या पतीशी भांडण झाल्यामुळे दोन मुलांसह ही महिला २००८ पासून माहेरीच वास्तव्य करीत होती. दरम्यान तिने २०१३ मध्ये दुसरे लग्न केले. या दुसऱ्या पतीपासूनही तिला एक मुलगा झाला होता.
पहिल्या पतीचा एक मुलगा, एक मुलगी तसेच दुसऱ्या पतीपासून झालेला मुलगा आणि पती असे सर्वजण ते एकत्र वास्तव्य करीत होते. दरम्यान, ५ सप्टेंबर २०१८ रोजी या महिलेच्या ११ वर्षीय मुलीच्या पोटात दुखत असल्याचे तिने सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. आपल्याच सावत्र पित्याने सर्वांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर चार ते पाच वेळा लैंगिक अत्याचार केल्याची बाब आईने विश्वासात घेतल्यानंतर मुलीने सांगितली. हा प्रकार उघड होताच याप्रकरणी या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार दाखल केली होती. मुंब्रा पोलिसांनी त्याला अटकही केली होती. याच प्रकरणाची सुनावणी ७ डिसेंबर रोजी ठाणे न्यायालयात झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश शिंदे यांनी तपासी अधिकारी तर पोलीस नाईक विद्यासागर कोळी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी नऊ साक्षीदार तपासून आरोपीला जास्तीत शिक्षा होण्यासाठी भक्कमपणे बाजू मांडली. सर्व बाजू पडताळून आरोपीला दोषी ठरवून न्यायालयाने सावत्र पित्याला २० वर्षे सश्रम कारावासाची तसेच २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.