ठाणे आयुक्तालयातील १५० ठिकाणांना धोका

By admin | Published: November 14, 2015 11:54 PM2015-11-14T23:54:56+5:302015-11-14T23:54:56+5:30

देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घातपाताच्या घटना लक्षात घेऊन तत्पूर्वी ठाणे शहर पोलिसांनी आयुक्तालयातील पाचही परिमंडळांत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता

In Thane, there are at least 150 places in danger | ठाणे आयुक्तालयातील १५० ठिकाणांना धोका

ठाणे आयुक्तालयातील १५० ठिकाणांना धोका

Next

ठाणे : देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घातपाताच्या घटना लक्षात घेऊन तत्पूर्वी ठाणे शहर पोलिसांनी आयुक्तालयातील पाचही परिमंडळांत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचा सहा महिन्यांपूर्वी शोध घेतला आहे. त्या ठिकाणांचे तीन गटांत वर्गीकरण करून त्यानुसार जवळपास १२५ ते १५० ठिकाणे निश्चित केली आहेत. या सर्वेक्षणात कल्याण परिमंडळात सर्वाधिक ठिकाणे असल्याचे समोर आले असून त्यांची नावे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे.
शनिवारी फ्रान्समधील पॅरीसमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी या सर्व ठिकाणांसह शहरात हाय अ‍ॅलर्ट जारी करून पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये विशेष गर्दीची ठिकाणे असलेले रेल्वे, बस स्थानके , सिनेमागृह आणि मॉल या ठिकाणांचा समावेश आहे. तर, हॉटेल आणि लॉज आदी ठिकाणांची पोलिसांकडून तपासणीबरोबर शहरातील मुख्य ठिकाणांवर नाकाबंदीही सुरू केल्याचेही सूत्रे म्हणाली.
मुंबई पोलीस दलापाठोपाठ ठाणे शहर पोलीस दलाकडे पाहिले जाते. शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर असे व्यापलेले आहे.
या परिसरात दिवसेंदिवस वाढत्या नागरिकांमुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्याचबरोबर मुंब्रा, भिवंडी ही ठिकाणे संवेदनशील म्हणून जगजाहीर आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली ही नेहमी गजबजलेली रेल्वे स्थानके म्हणून ओळखली जातात. त्याचबरोबर १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील आरडीएक्स मुंब्रा खाडीत सापडले होते. तसेच ठाण्यातील कळवा खाडी, अन्य आयुक्तालयांतील काही धार्मिक स्थळेही महत्त्वाची मानली जात असल्याने शहर पोलिसांनी संवेदनशील स्थळांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, प्रत्येक परिमंडळनिहाय अतिसंवेदनशील, संवेदनशील अणि त्यापेक्षा कमी संवेदनशील अशी स्थळे शोधण्यात आली आहेत. आयुक्तालयात अतिसंवेदनशीलपेक्षा संवेदनशील स्थळे अधिक असल्याची माहिती या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
भार्इंदरमध्ये पोलिसांच्या
गस्तीत वाढ
फ्रान्समधील पॅरीसमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या धर्तीवर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस ठाण्यांना हाय अ‍ॅलर्टचा संदेश दिला असून गतवेळच्या काही घटनांमुळे मीरा-भार्इंदरमधील गस्तीतही वाढ केल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरात यापूर्वी रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांपैकी एक स्फोट मीरा रोड लोहमार्गावर झाला आहे. तसेच काही अतिरेक्यांनादेखील येथून ताब्यात घेतल्याची तसेच एका तडीपार गँगस्टरलाही येथूनच अटक केली आहे.
या पार्श्वभूमीवर महासंचालकांनी दिलेल्या हाय अलर्टच्या आदेशानुसार शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविली आहे.

Web Title: In Thane, there are at least 150 places in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.