ठाणे : वाहतूककोंडी फुटेना, अडथळ्यांचा फेरा सुटेना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 09:43 AM2022-07-10T09:43:43+5:302022-07-10T09:44:05+5:30

खड्डे बुजविल्याच्या दाव्यानंतरही समस्या कायम...

Thane Traffic congestion has not erupted huge traffic jam at thane nashik highway | ठाणे : वाहतूककोंडी फुटेना, अडथळ्यांचा फेरा सुटेना

ठाणे : वाहतूककोंडी फुटेना, अडथळ्यांचा फेरा सुटेना

Next

ठाणे : ठाणे आणि वाहतूक कोंडी हे न उलगडणारे कोडे बनले आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि कोंडी नित्याचीच झालेल्या ठाणेकरांची पावसाळ्यात आणखी हालत खराब झाली आहे. कोंडीत तासनतास अडकून रहावे लागत असल्याने त्यांची कामे खोळंबत आहेत. नोकरदारांना लेटमार्क रोजचाच झाला असून चार दिवसांपासूनची ही कोंडी शनिवारी पाचव्या दिवशीही कायम असल्याचे चित्र ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात दिसले. 

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा कायम असताना गुरुवारी रात्री खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचा दावा संबंधित विभागाने केला आहे. खड्डे बुजविल्यानंतर कोंडी फुटेल, असे वाटत असतानाच सलग पाचव्या दिवशी वाहतुकीचे तीन-तेरा वाजल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.   

शुक्रवारी सांयकाळी वाहतूक कोंडी काहीशी कमी झाल्याचे दिसल्याने आता ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे वाटत होते. मात्र शनिवारची सकाळही वाहतूक कोंडीचीच ठरली. त्यातही शासकीय तसेच इतर काही कार्यालयांना सुट्टी असल्याने खासगी वाहनांची रेलचेल काहीशी कमी दिसली. वाहनांची संख्या कमी असली, तरी भिवंडी ते कापूरबावडीपर्यंत अन्य लहान-मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसले. अनेक वाहने एकाच ठिकाणी २० ते २५ मिनिटे थांबून होती. त्यानंतर धिम्या गतीने वाहतूक सुरू झाली. ही कोंडी नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर नाही, तर ठाण्याच्या मार्गावर झाल्याने ठाणेकरांनाच मनस्ताप सहन करावा लागला.   

खड्डे बुजविल्याच्या दाव्यानंतरही समस्या 
दुपारनंतर वाहतूक काहीशी हळूहळू का होईना पुढे सरकत असल्याचे चित्र दिसून आले, मात्र रोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून यावर तातडीने उपायोजना करून रोजच्या या जाचातून सुटका करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

दरम्यान गुरुवारी रात्रीपासून भिवंडी, साकेत मार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे, परंतु त्यानंतरही वाहतूक कोंडी कायम असल्याने या कोंडी मागचे नेमके कारण काय आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. कोंडीमुळे चालक सध्या त्रस्त झाले आहेत.

Web Title: Thane Traffic congestion has not erupted huge traffic jam at thane nashik highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.