शहरातील वाहतूक कोंडी ज्येष्ठांसाठी जाच, स्नेहसंमेलनात मांडली व्यथा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 2, 2024 06:15 PM2024-03-02T18:15:35+5:302024-03-02T18:15:44+5:30
वाढत्या वाहतूक कोंडीचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.
ठाणे: वाढत्या वाहतूक कोंडीचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. तासनतास ताटकळत कोंडीत अडकून रहावे लागते. त्यामुळे एका वाहनात इतके वेळ बसून राहण्याने शारिरीक त्रास होतो. तसेच, वाहनांची व्यवस्था नीट नसल्याने वाकडे तिकडे वाहने चालविली जातात आणि अपघात होण्याची शक्यता असते असा एकसूर आज ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीच्या स्नेहसंमेलनात ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रकाश दिघे यांनी या मुद्दयाची तात्काळ दखल घेत ठाणे वाहतूक विभागासोबत बैठक आयोजित करुन हे मुद्दे मांडले जाणार असल्याचे आश्वासन दिले.
वसंतराव नाईक सभागृहात ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीचे २३ वे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित ज्येष्ठांनी वाहतूक कोंडीची समस्या किती जाचक आहे अशी व्यथा मांडली. सुरूवातीला सर्वांचे स्वागत माजी अध्यक्ष सुरेश गुप्ते यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संघाचे सर्वांत जुने सदस्य ९३ वर्षीय विजय नागराज होते. त्यांच्यासह दिघे उपाध्यक्ष रविंद्र दळवी आणि सचिव शुभांगी बावडेकर आदी उपस्थित होते.
लुईसवाडी ज्येष्ठ नागरिक संघाने ईशस्तवन सादर केले. शुभांगी बावडेकर यांनी प्रास्ताविक तर नागराज यांच्या हस्ते मानकरी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. दिघे आणि बावडेकर यांच्याहस्ते संपादक मंडळांचा सन्मान करण्यात आला. या स्नेहलंमेलननिमित्त ज्येष्ठांची कॅरम स्पर्धा, स्मरणशक्ती, शब्दकोडे, संगीत खुर्ची, बादलीत चेंडू टाकणे या स्पर्धांमधील विजेत्यांचा सत्कार करण्यात आले. मार्च २०२० नंतर हा पहिलाच स्नेहसंमेलन सोहळा असल्याचे अध्यक्ष दिघे यांनी नमूद करताना सर्वांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी संघातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देऊन सायबर सारख्या गुन्ह्यांमध्ये फसू नको. आर्थिक फसवणूकीला बळी पडू नका असे आवाहन केले. तसेच, आगामी कार्यक्रमाची माहिती दिली. सेव्हन स्टार ग्रुप ठाणेयांच्यावतीने अलका वढावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मधुबाला ते माधुरी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यात प्यार किया तो डरना क्या, आयी ए मेहबरबान, एक दो तीन, मार डाला, धक धक करने लगा, चने के खेत मै अशा विविध गाण्यांवर नृत्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दळवी यांनी केले.