ठाणे वाहतूक पोलिसांनी २८ दिवसांमध्ये केली तीन कोटींची विक्र मी दंड वसूली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:51 PM2020-12-29T16:51:31+5:302020-12-29T16:55:18+5:30
वाहतुकीचे नियम मोडून ई चलानद्वारे आकारलेले दंड थकीत ठेवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत गेल्या २८ दिवसांत तब्बल तीन कोटींचा भरणा चालकांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाहतुकीचे नियम मोडून ई चलानद्वारे आकारलेले दंड थकीत ठेवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत गेल्या २८ दिवसांत तब्बल तीन कोटींचा भरणा चालकांनी केला आहे. मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. या तपासणीमध्येही ही थकीत दंड वसूलीची मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी मंगळवारी दिली.
ठाणे वाहतूक शाखेने १४ फेब्रुवारी २०१९ पासून सुरु केलेल्या ई चलान मोहीमेद्वारे आतापर्यंत २६ कोटींपेक्षा अधिक दंड ठोठावला आहे. या दंडाच्या रकमेचा भरणा होत नसल्याने याविरुद्ध उपायुक्त पाटील यांनी १ डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली. सुरु वातीला या मोहिमेअंतर्गत प्रतिदिन सुमारे दोन लाख रु पयांचा दंड वसूल केला जात होता. ती रक्कम आता सरासरी १० लाखापर्यंत गेली आहे. गेल्या चार दिवसांपासून मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाईसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेतील तपासणीदरम्यान ई चलानची थकबाकी आढळल्यास ती वसूल केली जात आहे. अशा पद्धतीची कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी स्वत: थकीत दंडाची रक्कम भरून सहकार्य करावे. विशेष म्हणजे ठाण्यात वास्तव्याला असलेल्या काही मराठी सिने अभिनेत्यांसह काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आपल्या थकीत दंडाची रक्कम भरल्याचे पाटील यांनी सांगितले. आपल्या वाहनांद्वारे कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे, याची सविस्तर माहिती ई चलानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली असून ती भरण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी त्याचा अवलंब करुन या थकीत दंडाचा भरणा करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
* सर्वाधिक वसूली नारपोलीतून
वाहतूक शाखेच्या नारपोली युनिटने सर्वाधिक ३७ लाख ९१ हजार ३५० रुपयांची थकबाकी वसूली केली. यामध्ये २२ लाख ५८ हजारांच्या रोख रकमेचा समावेश आहे. त्यापाठोपाठ कल्याण युनिटने २६ लाख २७ हजारांचा तर उल्हासनगर युनिटने २५ लाख तीन हजार ७५० रुपये दंडाची वसूली केली.