धावत्या एक्स्प्रेसमध्ये ठाण्यात तरुणीची छेडछाड; टिष्ट्वट करून केली तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 09:21 PM2018-01-28T21:21:13+5:302018-01-28T21:33:23+5:30
ठाणे : रविवारी पहाटे ३ ते सव्वातीनच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झालेल्या कोणार्क एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या एका अठरावर्षीय तरुणीची एका व्यक्तीने छेड काढल्याची घटना घडली आहे. याबाबत, त्या तरुणीने मुंबई पोलीस आयुक्तांसह काही वृत्तवाहिन्यांना टिष्ट्वट करून घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलिसांसह लोहमार्ग पोलिसांची धावाधाव झाली.तर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, फलाट क्रमांक-६ वर सीसीटीव्ही नसल्याची बाब पुढे आली आहे.
नालासोपारा येथे राहणारी अठरावर्षीय तरुणी ही बीएमएमची विद्यार्थिनी आहे. शनिवारी ती भुवनेश्वर येथून मुंबईला येण्यासाठी कोणार्क एक्स्प्रेसमध्ये बसली. पहाटे सव्वातीनच्या दरम्यान ही एक्स्प्रेस ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक-६ येथे आली. ही गाडी ठाण्यातून मुंबईकडे रवाना होताना एक अनोळखी या धावत्या गाडीत बोगी क्र. बी-१ मध्ये शिरला. त्या बोगीत असलेल्या या संबंधित तरुणीची छेडछाड काढून तो क्षणात फलाटावर उतरला. या तरुणीने दादर येथे उतरल्यावर झाल्या प्रकाराबाबत टिष्ट्वट करत मुंबई पोलीस आयुक्त आणि काही वृत्तवाहिन्यांना ही माहिती दिली.
मुंबई पोलीस आयुक्तांना टिष्ट्वट केल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांसह शहर पोलिसांची दिवसभर धावाधाव सुरू होती. याबाबत शहर पोलिसांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून या प्रकाराबाबत असे काही झाले का, याची खातरजमा करून घेतली. तर, हा प्रकार रेल्वे स्थानकात झाल्याने लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. मात्र, फलाट क्रमांक-६ वर सीसीटीव्ही कॅमेराच नसल्याची बाब पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत टिष्ट्वटवर तक्रार करण्यात आली त्यानुसार,विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीद्वारे त्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली.