ठाणे परिवहनचे प्रवासी घटले, मात्र अपघातांत झाली दुपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:22 AM2020-01-02T00:22:04+5:302020-01-02T00:22:12+5:30
ठाणे परिवहनच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत असतानाही प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाणे : ठाणे परिवहनच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत असतानाही प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत प्रवासीसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून तुलनेने अपघात मात्र दुपटीने वाढले आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात परिवहनकडे दोन लाख ३७ हजार ३२४ प्रवासी होते. या वर्षभरात २१ अपघात घडले होते. २०१८-१९ या आर्थिक वर्षात एक लाख ७६ हजार ६८३ इतकी प्रवासीसंख्या असून या वर्षभरात ५८ अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभरात अपघातात वाढ झाली असून प्रवाशांच्या संख्येत मात्र ६० हजारांची घट झाल्याचे उघड झाले आहे.
ठाणे महापालिकेचा महत्त्वाचा घटक असलेली परिवहन सेवा अर्थात टीएमटी १९८९ साली सुरू झाली. टीएमटीच्या ताफ्यात एकूण ४७७ बस असून त्यापैकी २७० बस दररोज १०२ मार्गांवर धावतात. यातील बहुतांश बस कंत्राटी असून यात नव्याने दाखल झालेल्या १० तेजस्विनी बसचा समावेश आहे. कुठलेही वेळापत्रक नसलेल्या टीएमटीचा प्रवास रडतपडत सुरू असल्याने प्रवासीवर्गातून तक्रारी येत असतानाच यंदाच्या आर्थिक वर्षात प्रवासीसंख्येत दोन वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून आले आहे. दिवसेंदिवस नागरिकीकरण वाढत असतानाही २०१६-१७ मध्ये प्रवासीसंख्या एक लाख ८२ हजार २५६ होती. २०१७-१८ या वर्षी दोन लाख ३७ हजार ३२४ प्रवासी होते. यंदा लोकसंख्या २५ लाखांच्या घरात पोहोचली असतानाही २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रवासीसंख्या घटून एक लाख ७६ हजार ६८३ इतकी असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर, शहरातील रस्त्यांचे रु ंदीकरण आणि काँक्रि टीकरण होण्यासह अनेक नवीन मार्ग निर्माण झाले असतानाही मागील दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत बस अपघातांमध्ये वाढ झाल्याची कबुली स्वत: परिवहन सेवेने दिली आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाच्या लेखी २०१६-१७ या वर्षात २८ अपघात घडले असून त्यामुळे दोघांचा मृत्यू ओढवला होता. २०१७-१८ मध्ये २१ अपघात घडले असून २०१८-१९ मध्ये दुपटीहून अधिक म्हणजेच ५८ अपघात घडले आहेत. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे अहवालात दर्शवण्यात आले आहे.