ठाणे परिवहन सेवा जपतेयं सामाजिक बांधिलकी, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना परिवहनमधून मोफत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 02:39 PM2020-04-03T14:39:03+5:302020-04-03T14:39:43+5:30
कोरोनाशी लढा देतांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आपणही काही तरी करु शकतो या उद्देशाने ठाणे परिवहन सेवेमार्फत २३ मार्च पासून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत या बसेसमधून २६ हजार ६७२ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेतला आहे.
ठाणे : कोरोना व्हायरसच्या पाशर््ववभूमीवर देशभर संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा प्रश्न आ वासून उभा राहिला होता. परंतु त्यांच्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ठाणे परिवहन सेवेने या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या काही बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे इतर प्राधिकरणाकडून तिकिटाचे पैसे आकारत जात असताना या सर्व कर्मचाऱ्यांना ना ठाणे परिवहन सेवेने मात्रत प्रवास घडवून एका सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत अत्यावश्यक सेवेत येणारे दोन हजाराच्यावर विविध विभागाचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावण्याकरिता येतात. या कर्मचाऱ्यांमध्ये रु ग्णालयातील कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवा यांचा समावेश आहे. हे कर्मचारी विविध ठिकाणाहून येत आहेत. सध्या संचारबंदी असल्याने तसेच रेल्वेसेवा रिक्षा आदी बंद असल्याने या कर्मचाऱ्यांना प्रवासाची साधने उपलब्ध नाहीत. परिणामी या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये. याकरिता ठाणे परिवहन सेवेने आपल्या २० टक्के बसेस २३ मार्चपासून रस्त्यावर उतरवल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे या बसेस रस्त्यावर उतरवताना त्यांनी अत्यावश्यक सेवेत समाविष्ट कर्मचारी कोणकोणत्या भागातून येतात त्याची सविस्तर माहिती जमा केली. त्यानंतर हे कर्मचारी जेथून येतात त्यातील काही मार्गांवर ठाणे परिवहन सेवेची बस धावत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परंतु कर्मचाऱ्यांची अशा प्रसंगी गैरसोय होऊ नये म्हणून या मार्गावरही बसेस चालविण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला. त्यानंतर पनवेल, पालघर, नालासोपारा, बदलापूर, आसनगाव, कर्जत, कल्याण, डोंबिवली, शहापूर ऐरोली, नवी मुंबई, बोरिवली, दादर यांच्यासह ठाण्यातील कळवा, मुंब्रा, खोपट, स्टेशन, कोपरी आदी ठिकाणी या बसेस सुरु करण्यात आल्या. ही सेवा देतांना परिवहन सेवेने केवळ आनंद नगर आगारचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठराविक वेळेत येथून या बसेस २३ मार्चपासून सोडण्यात येत आहेत.
त्यासाठी ठराविक कर्मचाºयांना बोलविण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे हे सर्व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याने या सर्वांना ही प्रवासाची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे परिवहन सेवेने घेतला. त्यानुसार २३ मार्च ते २ एप्रिल पर्यंत २६ हजार ६७२ प्रवाशांना विविध भागातून मोफत सेवा परिवहन सेवेने दिली आहे. ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मोफत सेवा देण्यामागे आमचे दोन मुख्य उद्देश होते. एक म्हणजे तिकिटाचे पैसे घेताना वाहक आणि प्रवासी एकमेकांच्या सातत्याने संर्पकात येणार होते. जे कोरोनाच्या पाशर््ववभूमीवर अत्यंत धोकादायक आहे. त्याकरिता सोशल डिस्टेस्टींसींग राखणे गरजेचे होते. दुसरीबाब म्हणजे या कठीण प्रसंगीही ही लोक आपले कर्तव्य बजावत असल्याने त्यांना मोफत प्रवास देण्याचा आम्ही निर्णय घेतला असे माळवी यांनी सांगितले.