ठाणे परिवहन कर्मचाऱ्यांची आजही ४० कोटींची देणी प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:29 PM2018-02-27T14:29:35+5:302018-02-27T14:29:35+5:30
ठाणे परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांची तसेच सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची अशी मिळून जुलै २०१३ पासून आजपर्यंतची ४० कोटींची देणी प्रलंबित आहे.
ठाणे - ठाणे परिवहन सेवेचे अंदाजपत्रक नुकतेच सादर झाले असून यामध्ये परिवहनच्या कामागारांची महागाई भत्ता, सार्वजनिक सुट्या, वैद्यकीय भत्ता आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यां थकबाकीपोटी परिवहनला आजही ४० कोटींची देणी देणे शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. जुलै २०१३ पासूनची ही थकबाकी असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.
परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ३१३ बस असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्यावर १८० च्या आसपास धावत आहेत. परिवहनचे प्रवासी एक लाखांनी कमी झाले असून रोज परिवहनमधून सुमारे दिड लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. परिवहनचे रोजचे उत्पन्न हे पूर्वीपेक्षा अधिक झाले आहे. यापूर्वी परिवहनला १८ ते २० लाखांचे उत्पन्न मिळत होते. यंदा मात्र हेच उत्पन्न २८ ते ३० लाखांच्या घरात गेले आहे. उत्पन्न वाढत गेल्याने आता परिवहन सेवेने देखील परिवहन कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्यास सुरवात केली आहे. पूर्वी ८० कोटींच्या घरात असलेली थकबाकीची रक्कम ही आजच्या घडीला ४० कोटींच्या घरात आली असल्याची माहिती अंदाजपत्रकातून समोर आली आहे. परंतु परिवहनच्या उत्पन्नापेक्षा खर्च हा अधिक असल्याने परिवहनपुढे थकबाकीचा डोंगर आजही उभा राहिला आहे. यातीलच एक महत्वाची बाब म्हणजे आजही परिवहनच्या कर्मचाऱ्यांना पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळालेली नाही. सहाव्या वेतन आयोगातील फरकाच्या महागाई भत्याची २१ कोटी ८९ लाख ९२ हजार ४५५ रुपयांची रक्कम देणे आजही प्रलंबित आहे. या रकमेतील २१ कोटी ८० लाख रुपये हे पालिकेकडे अनुदानरुपी मागण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक सुट्यापोटी, यामध्ये भाऊभीज, पाडवा, रक्षाबंधन, एक मे, गणपती आदींसह इतर सुट्यांचे ५ कोटी १६ लाख, वैद्यकीय भत्यापोटी १ कोटी ६० लाख ८० हजार, रजा प्रवास भत्ता ६ कोटी ६६ लाख ५० हजार ८५०, पुरक पोत्साहन भत्ता ४१ लाख ५१ हजार ३५० आणि सेवा निवृत्त कर्मचाºयांची ४ कोटी २० लाखांची अशी एकूण मिळून सुमारे ४० कोटींची देणी शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.