ठाणे मतदारसंघात दोनच उमेदवार उच्चशिक्षित, कोणत्या मेरिटवर होते मतदान?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 01:46 AM2019-04-14T01:46:10+5:302019-04-14T01:47:05+5:30
लोकसभा निवडणुकांसाठी ठाणे मतदारसंघातून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
- अजित मांडके
ठाणे : लोकसभा निवडणुकांसाठी ठाणे मतदारसंघातून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत. यामध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच कमी असल्याचे चित्र आहे. २३ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवार पदवीधरदेखील झालेले नाहीत. तर ८ टक्के जणच पदव्युत्तर पदवीधारक आहेत.
राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. परंतु, प्रत्यक्षात राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्येदेखील पदवीधरांचे प्रमाण २६ टक्के एवढे आहे.
निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची पाहणी केली असता ही बाब समोर आली आहे. ठाणे मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात आहेत. यातील २६ टक्के उमेदवार हे पदवी तर पदव्युत्तर ०८ टक्के उमेदवार तर अवघ्या ६ उमेदवाराकडे पदवी आहे.
>कला शाखेचे सर्वाधिक पदवीधर
एकूण पदवीधर उमेदवारांमध्ये कला विषयातील सर्वाधिक पदवीधरांचा समावेश आहे. एकूण पदवीधरांच्या तुलनेत ३ उमेदवार हे कला पदवीधर, तर ३ उमेदवार हे वैद्यकीय आणि विज्ञान पदवीधर आहेत. रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.
>उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाही
उच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे असा मोठा मतप्रवाह आहे. मात्र, अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसते. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण २१ उमेदवार अपक्ष आहेत. यातील अवघे २८ टक्के उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर आहेत. ९ टक्के उमेदवार हे बारावी तर उर्वरित उमेदवार दहावी उत्तीर्णच आहेत. केवळ एका उमेदवाराने पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
>मतदार देतात का राजकीय नेत्यांच्या शिक्षणावर भर?
>कला विषयांतील
सर्वाधिक पदवीधर
एकूण पदवीधर उमेदवारांमध्ये कला विषयांतील सर्वाधिक पदवीधर आहेत. एकूण पदवीधरांच्या तुलनेत १३ टक्के उमेदवार हे कला विषयांतील पदवीधर आहेत. त्यामुळे कला शाखेतील उमेदवार हे निवडणुकीत मतदारांचा कौल कसा घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
>पदव्युत्तर दोन उमेदवार
एकूण पदवीधर उमेदवारांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या अवघी २ एवढी आहे. त्यामुळे एकूण उमेदवारांच्या प्रमाणात पदवीत्तर शिक्षण घेतलेल्यांचे प्रमाण हे केवळ ८ टक्के एवढे आहे. त्यामुळे लोकशाहीत उच्चशिक्षिताला आता किती प्राधान्य मिळणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
>४ ते १० वी पास अधिक
एकूण पदवीधर उमेदवारांमध्ये चवथीपासून ते १० पर्यंत शिक्षण घेणारे हे १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे एकूणच उमेदवारांच्या प्रमाणात अल्पशिक्षित उमेदवारांचा टक्का ४४ एवढा आहे. तर १२ वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या २ एवढी आहे.