ठाण्यात दोन सिलिंडरच्या स्फोटांनी लागलेल्या आगीत २२ झोपड्या खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:18 AM2020-01-04T00:18:23+5:302020-01-04T00:18:26+5:30
कोणतीही जीवितहानी नाही; होरपळल्याने दोन मांजरांचा मृत्यू
ठाणे : घोडबंदर रोडवरील शासकीय भूखंडावर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांमध्ये दोन सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीत जवळपास २० ते २२ झोपड्या जळून खाक झाल्या. ही आग लावण्यात आल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दोन मांजरे होरपळून दगावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घोडबंदर रोडवरील तुर्फेपाडा येथे ब्रह्मांड फेज-२ चे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या शिवनेरी इमारतीजवळील मोकळ्या शासकीय भूखंडावर पत्र्यांची बेकायदा घरे उभारण्यात आली आहेत. त्याच झोपड्यांना शुक्र वारी सायंकाळी अचानक आग लागली. आगीत त्या झोपड्यांमधील दोन सिलिंडरचे स्फोट झाले असून एक सिलिंडर लीक झाला होता.
या आगीमुळे तेथील जवळपास २२ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तसेच शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून उभारलेल्या या झोपड्यांवर एकदोन दिवसांत कारवाई केली जाणार होती. त्याबाबत त्यांना नोटीसही धाडल्या होत्या. ही आग विझविण्यासाठी दोन फायर इंजीन, दोन रेस्क्यू व्हॅन, एक वॉटर टँकर आणि एक जम्बो वॉटर टँकर पाचारण केल्याची माहिती आपत्ती कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.