Thane : कळव्यामध्ये खोलीतील स्लॅब कोसळून दोन चिमुकले जखमी
By अजित मांडके | Published: February 25, 2023 02:44 PM2023-02-25T14:44:18+5:302023-02-25T14:45:14+5:30
Thane: कळवा सुर्यानगर भागातील श्री साईनिवास या अनाधिकृत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून दोन लहान मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे.
- अजित मांडके
ठाणे : कळवा सुर्यानगर भागातील श्री साईनिवास या अनाधिकृत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून दोन लहान मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या या दोन लहान मुलांना महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या खोलीच्या कॉलमला तडे गेल्याने महापालिकेने खोली रिकामी केली असून या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडीट करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या अहवालानंतर इमारत पूर्ण खाली करायची की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
या दुर्घटनेत अक्षित आशिष सिंग (४ वर्षे) आणि आर्या आशिष सिंग ( ७ वर्षे) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. अक्षितच्या डोक्याला व कानाला किरकोळ दुखापत झाली आहे. तर आर्याच्या डोक्याला व कमरेला किरकोळ दुखापत झाली आहे. कळवा येथील सूर्या नगर भागात श्री साईनिवास ही अनधिकृत इमारत आहे. ही इमारत १५ वर्षे जुनी असून त्यात एकूण ४५ कुटुंबे राहत आहेत. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर १०४ क्रमांकाची खोली गौतम शहा यांच्या मालकीची असून या खोलीत आशिष सिंग हे भाड्याने राहतात.
शनिवारी दुपारी खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून त्यात अक्षित आणि आर्या ही दोन मुले जखमी झाले आहेत. या खोलीतील कॉलमला देखील तडे गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच प्रभाग समितीचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागामार्फत या खोलीला टाळे लावले असून खोलीतील सिंग कुटुंबिय नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले आहेत.