Thane: नोकरीचे प्रलाेभन दाखवून अनोळखी महिलेने घातला १९ लाखांचा गंडा, सोशल मीडियाचा केला वापर
By जितेंद्र कालेकर | Published: January 16, 2023 10:04 PM2023-01-16T22:04:54+5:302023-01-16T22:05:28+5:30
Crime News: नोकरी लावण्याचे प्रलाेभन दाखवून एका अनोळखी महिलेने कळव्यातील विक्रांत घंटे (४०) यांना १९ लाख ८७ हजारांचा ऑनलाइन
ठाणे - नोकरी लावण्याचे प्रलाेभन दाखवून एका अनोळखी महिलेने कळव्यातील विक्रांत घंटे (४०) यांना १९ लाख ८७ हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी सोमवारी दिली.
कळव्यातील रहिवासी विक्रांत यांना ७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता मोबाइलवर एका अनोळखी महिलेने कॉल करून नोकरीसाठी अटी व शर्ती सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर यू ट्यूब आणि इंस्टाग्राम या प्लॅटफार्मवर ग्राहकांचे लक्ष आणि प्रभाव वाढविण्यासाठी तिच्या अभिषेक आणि मंदार या दोन साथीदारांनीही आपसात संगनमत करून टेलिग्राम आयडीवर संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळया यूपीआय आयडीवर आणि आयसीआयसी या बँक खात्याद्वारे १९ लाख ८७ हजारांची रक्कम ऑनलाइन स्वीकारून त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर विक्रांत यांनी अनाेळखी मोबाइलधारक महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत १५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एन. ए. कानडे करत आहेत.