ठाणे, वसई, मीरा रोड मार्गावर कोंडी, चाचणीसाठी जुना वरसावे पूल बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 05:25 AM2020-03-06T05:25:18+5:302020-03-06T05:25:39+5:30
या काळात वाहनांसाठी नव्या वरसावे पुलाचा पर्याय खुला ठेवला होता. पुलाच्या चाचणी कामामुळे वाहनचालकांना सात तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.
पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुन्या वरसावे पुलाची चाचणी घेण्याच्या कामामुळे हा पूल गुरुवारी सकाळी १० ते सायं. ५ असा ७ तास वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला होता. या काळात वाहनांसाठी नव्या वरसावे पुलाचा पर्याय खुला ठेवला होता. पुलाच्या चाचणी कामामुळे वाहनचालकांना सात तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील वरसावे जुना पूल हा मुंबई आणि गुजरातला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. सध्या पुलाच्या चाचणीचे काम असल्यामुळे गुुुरुवारी रस्ते महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून हा महामार्ग सात तास बंद ठेवण्यात आला होता. तशा सूचना काही दिवस आधीच दिल्या होत्या. तरी या काळात ठाणे, वसई आणि काशिमीरा या तिन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने चालकांची या कोंडीतून सुटका होत होती. वसई तालुक्यातून जाणाºया महामार्गावरील मालजीपाडा, मीरा रोड या मार्गांवर दहिसर चेकनाका तसेच ठाणे मार्गावर चेना ब्रिजपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचप्रमाणे मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहने आणि गुजरातहून मुंबईत दाखल होणारी वाहने यांनाही वाहतूककोंडीचा फटका बसला. संध्याकाळी ५ नंतर चाचणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील वाहतूक हळूहळू सुरळीत सुरू होत होती.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाल
पूल बंद ठेवल्याचा सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला. कोंडीत अडकलेल्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. परीक्षा सुरू आहेत, हे माहीत असतानाही प्रशासनाने असा निर्णय घ्यायला नको होता, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.