ठाणेकरांना प्रतीक्षा मालमत्ताकरमाफीची; महाविकास आघाडी स्वप्न साकारेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 05:36 AM2020-01-29T05:36:59+5:302020-01-29T05:37:15+5:30

मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफीची घोषणा ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी केली होती.

Thane waives property tax waiver; Will development lead to a dream? | ठाणेकरांना प्रतीक्षा मालमत्ताकरमाफीची; महाविकास आघाडी स्वप्न साकारेल का?

ठाणेकरांना प्रतीक्षा मालमत्ताकरमाफीची; महाविकास आघाडी स्वप्न साकारेल का?

Next

ठाणे : मुंबईत ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ करण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन भाजप सरकारने केली होती. त्याच धर्तीवर ठाण्यातही ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफीचे आश्वासन २०१७ च्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळेस सत्ताधारी शिवसेनेने दिले होते. परंतु, त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने आणि मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच असल्याने हा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे ते आपल्या ठाणे भेटीत दिलेले आश्वासन पूर्ण करतात का याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफीची घोषणा ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी केली होती. मुंबईत शिवसेनेची कोंडी करून ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफीची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केली होती. ठाण्यात मात्र अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.
२०१७ नंतर आतापर्यंत महासभेत एकदाही करमाफीचा प्रस्ताव प्रशासनाने आणलेला नाही. याउलट मालमत्ताकरामध्ये १० टक्के कारवाढीचा प्रस्ताव बजेटमध्ये आणला होता. जोपर्यंत सभागृहात करमाफीचा प्रस्ताव येणार नाही तोपर्यंत कोणत्याच प्रकारच्या प्रशासकीय हालचाली करता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घोषणा करूनही मालमत्ताकरमाफीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी न आणल्याने यापूर्वी झालेल्या महासभेत विरोधकांकांनीच तो आणला होता. मात्र, पुढे कोणत्याच प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. आता तर राज्यात विरोधकच शिवसेनेबरोबर सत्तेत आहेत. त्यामुळे ठाणेकरांना करमाफी मिळेल, अशी आशा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ६ फेब्रुवारी ठाणेकरांच्या भेटीला येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते क्लस्टरचे भूमिपूजन तसेच बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे लोकार्पण, दिव्यांगासाठी स्टॉल आणि घरांचे चाव्या वाटप आदींसह इतर कार्यक्रमांसाठी ते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी ठाणेकरांना दिलेले आश्वासन ते पूर्ण करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

ठाण्यात भाजपची कोंडी करण्यात सेनेला अपयश
विविध मुद्यांवर श्रेय घेण्यासाठी मुंबई आणि ठाण्यात सुरुवातीपासूनच भाजप-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू आहे. तरीही ठाण्यात मात्र भाजपची कोंडी करणे, त्यासाठी दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती करणे सत्ताधारी शिवसेनेला हवे तसे जमलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

आम्ही जे वचन देतो ते आम्ही पाळतो, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे ठाणेकरांना मालमत्ताकरात सवलत लवकरच मिळेल.
- नरेश म्हस्के, महापौर, ठामपा

Web Title: Thane waives property tax waiver; Will development lead to a dream?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे