वाहतूक कोंडीत अडकले ठाणे, सकाळी खड्डे बुजवणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:19 AM2018-08-11T02:19:46+5:302018-08-11T02:19:59+5:30
ठाणे : वाहतूक पोलिसांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता ठेकेदारामार्फत खड्डे बुजवण्याची कामे सुरू करण्यात आल्याने घोडबंदरपट्ट्यात शुक्र वारी सकाळी ८ पासूनच वाहतूककोंडी झाली होती. जवळपास चार ते पाच तास कोंडी कायम होती. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी रात्री १२ ते पहाटे ६ पर्यंतची वेळ दिली असतानाही या नियमांचे पालन ठेकेदारांकडून होत नसल्याने वाहतूककोंडी होते. त्यामुळे सर्व ठेकेदारांना वाहतूक विभागाने नोटिसा दिल्या. यापुढे हा नियम न पाळणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची तंबीही ठेकेदारांना देण्यात आली आहे. दुसरीकडे माजिवडा येथे सुरू असलेले मेट्रोचे आणि मुंब्रा बायपासचे काम सुरू होण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी काढलेल्या अध्यादेशाचे पालन अवजड वाहनांकडून होत नसल्याने घोडबंदर आणि कळवा पुलावर वाहतूककोंडी होत आहे.
शुक्र वारी सकाळीच घोडबंदर आणि कळवा पुलावर वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. सकाळी ८ वाजतापासून घोडबंदर पट्ट्यात माजिवडा, मानपाडापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. रेल्वे मोटारमनच्या आंदोलनामुळे रेल्वेसेवेवर अवलंबून न राहता नागरिकांनी शुक्रवारी आपल्या वाहनांनी जाणेच पसंत केले. मात्र, वाहतूककोंडी होण्याचे हे एकमेव कारण नसून, पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा वाहतूक पोलिसांची मदत न घेता एमएसआरडीसीच्या ठेकेदारांनी या भागात खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याने कोंडी झाली असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. खड्डे बुजवण्यासाठी रात्री १२ ते पहाटे ६ पर्यंतची वेळ दिली असतानाही ठेकेदारांनी सकाळच्या वेळेस ते काम सुरू केले. पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये खड्डे बुजवण्यासाठी वेळ निश्चित केली असतानाही ठेकेदारांकडून ही वेळ पाळली गेली नाही. सकाळी वाहतूककोंडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम थांबवण्यात आले. सर्व ठेकेदारांना वाहतूक विभागाने नोटिसा दिल्या असून यानंतर जर निर्धारित वेळेत खड्डे बुजवले नाही, तर अशा ठेकेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. कोणतेही काम करताना संबंधित एजन्सीने वाहतूक पोलिसांना सूचना देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
>ठाण्यासह परिसरातील महामार्गांवरील वाहतूककोेंडीमुळे प्रवाशांनी आपला मोर्चा रेल्वेकडे वळविला होता. त्यामुळे
दुपारनंतर लोकलमध्ये प्रचंड गर्दी वाढली होती.मोटरमनच्या आंदोलनामुळे लोकलसेवा अगोदरच विस्कळीत झाली असताना वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची गर्दी लोकलवर वाढली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत लोकलमध्ये गर्दी जास्त होती. ठाणे स्थानकात प्रवाशांनी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीतील प्रवाशांनी दरवाजे न उघडल्यामुळे फलाटावरील काहींनी ती अडवण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांचा उद्रेक बघून रेल्वे प्रशासनाने त्यांना लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बसण्यास परवानगी दिली.
>मुंब्रा बायपासचे काम सुरू होण्यापूर्वी शहरात या कामादरम्यान वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानुसार नवी मुंबई आणि पालघरकडून वाहनांना शहरात येण्यासाठी विशिष्ट वेळ देण्यात आली होती. ही वाहने वेळ पाळली जात नसल्याने वाहतूककोंडीत भर पडत असल्याचे काळे यांनी सांगितले. याशिवाय, तत्त्वज्ञान विद्यापीठ नाक्यावर मेट्रोसाठी बॅरिकेड्स टाकण्यात आल्यानेही काही प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांनी कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.