वरुणराजाच्या कृपादृष्टीने ठाण्याची पाणीकपात रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 01:11 AM2020-08-19T01:11:49+5:302020-08-19T01:12:02+5:30
मुंबई महापालिकेने कमी केलेले १३ एमएलडी पाणी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे : गेल्या आठवड्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आता ठाण्यावर निर्माण झालेले पाणीकपातीचे संकट टळले आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी ठाण्याच्या काही भागांत झालेली पाणीकपात रद्द होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली असून, मुंबई महापालिकेने कमी केलेले १३ एमएलडी पाणी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाया तलावात फक्त ३४ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध होता. परिणामी, भविष्यातील गरज ओळखून मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला होता. या कपातीमुळे ठाण्यातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्यास सुरुवात झाली होती. मुंबई पालिकेकडून ठाणे पालिकेला दररोज ६५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र, २० टक्के कपातीमुळे १३ एमएलडी पाणी कमी करून ठाण्याला ५ आॅगस्टपासून ५२ एमएलडीच पाणीपुरवठा होत होता. दरम्यानच्या काळात चांगला पाऊस झाल्याने आता नियमीत पाणीपुरवठा होणार आहे.
>या भागात पुरवले जाते मुंबईकडून मिळणारे पाणी
मुंबई महापालिकेकडून
ठाण्याला दररोज मिळणारे ६५ एमएलडी पाणी नौपाडा, कोपरी, पाचपाखाडी, गावदेवी, जांभळीनाका, खारकर आळी, स्टेशन रोड, लुईसवाडी, अंबिकानगर, हाजुरी या भागांत
पुरविण्यात येते. मुंबई महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतल्यानंतर या सर्व भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता.
परंतु, आता तो पूर्ववत
होणार आहे.
>पूर्वी धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने मुंबई महापालिकेने पाणीकपात केली होती. त्यामुळे ठाण्याला १३ एमएलडी पाणी कमी मिळत असल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. आता धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने नियमित पाणीपुरवठा करण्याचे मान्य केल्याने ठाणे महापालिका हद्दीत पाणीकपात होणार नाही. - विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठा.म.पा.