Thane: 'आज हात जोडून आलोय, परत येणार तेव्हा..."; मनसेचे पदाधिकारी बँकेत गेल्यावर काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:35 IST2025-04-03T14:33:41+5:302025-04-03T14:35:02+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठीचा वापर झाला पाहिजे, अशी भूमिका मांडल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.

Thane: 'आज हात जोडून आलोय, परत येणार तेव्हा..."; मनसेचे पदाधिकारी बँकेत गेल्यावर काय घडलं?
-विशाल हळदे, ठाणे
MNS Thane news: 'दुर्दैव आहे की आम्हाला मराठी माणसालाच मराठी व्याकरणाचं पुस्तक द्यावं लागत आहे. हे पुस्तक घ्या आणि इथून सुरूवात करू. होणार, करू असं चालणार नाही. राज ठाकरेंनी सांगितल्या प्रमाणे झालेच पाहिजे', असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक बँकेच्या अधिकाऱ्यांना दिला. तुम्ही दोन दिवस मागत आहात आम्ही पाच दिवस देतोय, पण, बदललं नाही, तर मनसे स्टाईल आंदोलन करू असे पदाधिकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठी सक्तीचा मुद्दा गुढीपाडव्याच्या सभेत मांडला. त्यांनी मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना संदर्भात कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबई, ठाणे, पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांकडून बँकांच्या शाखांना भेटी देऊन याबद्दल इशारा दिला जात आहे.
दोन दिवस मागता आहात, पाच दिवस देतो पण...
ठाणे शहरातील कर्नाटक बँकेच्या शाखेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मराठी भाषेचा वापर करण्यासंदर्भातील निवेदन दिले.
वाचा >>राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे गेली बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये; अमराठी ब्रँच मॅनेजरने...
बँकेचे नाव आणि कार्यालयात मराठीत माहिती लावण्यासाठी अधिकाऱ्याने दोन दिवस मागितले. यावेळी मनसे पदाधिकारी म्हणाले, 'तुम्ही दोन दिवस मागत आहात. आम्ही पाच दिवस देतोय, पण हे बदललं पाहिजे. होणार, करतो हे चालणार नाही.'
'राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे झाले पाहिजे'
'आम्ही आज हात जोडून आलोय, परत येताना आम्ही हात सोडून येऊ. त्यावेळी आम्हाला बोलायचं नाही. आमची तुमच्याकडे विनंती आहे की, राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे झालेच पाहिजे. होणार, करू, हे आम्ही काही ऐकणार नाही', असा इशारा मनसेच्या पदाधिकार्यांनी बँकेच्या अधिकाऱ्याला दिला.
पोस्टाच्या कार्यालयातही आंदोलन
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील पोखरण २ येथील पोस्ट कार्यालयात आंदोलन केले. मनसेचे जनहित व निधी विभागाचे ठाणे शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. स्वतःच्या राज्यात पाहुणे बनू नका, महाराष्ट्रात मराठीचा वापर करा, असे टीशर्ट अधिकाऱ्यांना देत आंदोलन करण्यात आले.