ठाणे : वाहतूक नियम मोडणा-यांचे ढोलताशात स्वागत, वाहतूक पोलिसांचा अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:05 AM2017-12-21T01:05:49+5:302017-12-21T01:05:59+5:30
वाहतूक जनजागरण मोहिमेंतर्गत वाहतूक शाखेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वाहतूक नियम मोडणाºया वाहनधारकांवर नेहमीप्रमाणे कारवाई करण्याऐवजी त्यांचे ढोलताशाने स्वागत केले जात आहे. वाहतूक पोलिसांनी भरचौकात केलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे ठाणेकरांना आश्चर्याचा धक्का बसला.
ठाणे : टॅप (ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्राम) अर्थात वाहतूक जनजागरण मोहिमेंतर्गत वाहतूक शाखेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वाहतूक नियम मोडणाºया वाहनधारकांवर नेहमीप्रमाणे कारवाई करण्याऐवजी त्यांचे ढोलताशाने स्वागत केले जात आहे. वाहतूक पोलिसांनी भरचौकात केलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे ठाणेकरांना आश्चर्याचा धक्का बसला.
वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांकडून नेहमीच जागृती केली जाते. तरीही, त्याचा फारसा उपयोग होत नाही. वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जातात. अशा वेळी कारवाई केल्यास नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल कटुता निर्माण होते. त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी वाहतूक जनजागृती मोहीम सुरू केली.
या मोहिमेंतर्गत शनिवारी सिनेअभिनेता संतोष जुवेकर यांच्या मदतीने ठाणेकरांनी मजेशीर शिक्षा अनुभवली. या वेळी तीनहातनाका, कॅडबरी जंक्शन आणि हरिनिवास सर्कल येथे वाहतूक पोलिसांची पथके संतोष जुवेकर यांच्यासोबत ढोल आणि ताशे घेऊन उभी होती. नियम मोडणाºया ठाणेकरांचे या वेळी ढोलताशांनी स्वागत करण्यात आले. पथकाने वाहनधारकांना त्यांची चूक प्रेमाने लक्षात आणून देत वाहतूक नियमांची माहिती देऊन साक्षर करण्यात आले. यापुढे वाहतूक नियम तोडणार नाही, असे मैत्रीपूर्ण वचन जुवेकर यांनी त्यांच्या स्टाइलने नागरिकांकडून घेतले. महत्त्वाचे म्हणजे वाहनधारकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई पोलिसांनी केली नाही. याउलट, तोडलेला नियम लिहिलेली की-चेन भेट देण्यात आली.