ठाणे होणार पर्यावरणाभिमुख
By Admin | Published: January 8, 2017 02:38 AM2017-01-08T02:38:53+5:302017-01-08T02:38:53+5:30
ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या चार महत्त्वाच्या पर्यावरणाभिमुख प्रकल्पांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या चार महत्त्वाच्या पर्यावरणाभिमुख प्रकल्पांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हिरवा कंदील दिला. यामध्ये थर्माकोल रिसायकलिंग, प्लास्टिकपासून वंगण तेल, बांधकाम व तोडफोड कचऱ्यापासून बांधकाम साहित्य आणि सामायिक जैव वैद्यकीय प्रकल्पाचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांचे लेटर आॅफ इंटेट नुकतेच देण्यात आले.
थर्माकोल रिसायकलिंग प्रकल्पामध्ये शहरातील १ टन प्रतिदिन थर्माकोलचे पुनर्चक्र ीकरण करून त्यापासून फोटो फ्रेम, सीडी कव्हर बनवण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य निर्माण करण्यात येणार आहे. सीपी तलाव येथे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. इन्सुपॅक थर्माकोल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या माध्यमातून तो चालवण्यात येणार आहे. याच ठिकाणी प्लास्टिकपासून वंगण तेल बनवण्याचा प्रकल्प अभय एनर्जी सोल्युशन ही कंपनी राबवणार आहे. शहरातील नागरी घनकचऱ्यातील कमी व्यावसायिक मूल्याच्या प्लास्टिकचा वापर करून त्यापासून बॉयलर, फर्नेसिंगसाठी लागणारे वंगण तेल बनवण्यात येणार आहे. रोज ५ हजार टनांवर प्रक्रि या करण्याचा हा प्रकल्प आहे.
दिल्लीतील मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग कंपनीद्वारे डायघर येथे टाइल्स, पेव्हर ब्लॉक प्रकल्प राबवण्यात येईल. याचप्रमाणे तेथेच पर्यावरण दक्षता मंचतर्फे सामायिक जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
- शहरातील बांधकाम व तोडफोड कचऱ्यापासून बांधकाम साहित्य बनवण्याच्या प्रकल्पालाही महापालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे. यामध्ये जवळपास ३०० टन कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करून टाइल्स, पेव्हर ब्लॉक, काँक्रिट ब्लॉक बनवण्यात येणार आहे.