सोमवापासून ठाणे होणार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:53+5:302021-06-18T04:27:53+5:30

ठाणे : कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असली तरी मागील २०१९ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान, पाणीपुरवठा, ...

Thane will be jammed from Monday | सोमवापासून ठाणे होणार ठप्प

सोमवापासून ठाणे होणार ठप्प

Next

ठाणे : कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असली तरी मागील २०१९ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान, पाणीपुरवठा, ड्रेनेज आदींसह इतर विभागांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची ७०० ते ८०० कोटींची बिलेच अदा केलेली नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या ठेकेदारांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता भर पावसात महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. येत्या दोन दिवसांत पाणी विभागाने बिल काढले नाही, तर सोमवारपासून सुरू असलेली सर्वच कामे बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला.असे झाले तर पाणीकोंडी, गटार स्वच्छतेसह पावसाळ्यातील आणीबाणी निवारण्यास अडचणी येणार असल्यामुळे ऐन पावसाळ्यात महापालिकेची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. मालमत्ताकर आणि पाणीपुरवठा करांवरच सध्या मदार आहे. परंतु, २०१९ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान, पाणीपुरवठा, ड्रेनेज आदींसह इतर विभागातील कामे पूर्ण करणाऱ्या ठेकेदारांची अद्यापही बिले निघालेली नाहीत. कोरोना काळातही आमच्याकडून अत्यावश्यक कामे करून घेतली आहेत. त्यासाठी लोकप्रतिनिधीदेखील आमच्या मागे लागले होते. परंतु, आता कामे पूर्ण झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी देखील आमच्याकडे पाठ फिरविली असल्याचा आरोप यावेळी ठेकेदारांनी केला. बिले निघत नसल्याने कच्चा माल ज्यांच्याकडून घेतला आहे, त्यांचे फोन येऊन त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेची कामे पूर्ण करण्यासाठी कर्ज काढून कामे केलेली आहेत. परंतु, आता कर्जाचे हप्ते थकले आहेत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. कामे करून घेण्यासाठी जे काही कर्मचारी कामाला होते, त्यांनादेखील देण्यासाठी पैसे नसल्याचा मुद्दा यावेळी या ठेकेदारांनी उपस्थित केला.

अन्यथा आत्महत्येची वेळ येईल

दरम्यान मधल्या काळात आंदोलन केल्यानंतर २५ लाखांपर्यंतची बिले काढण्यात आली होती. परंतु, त्यानंतर ती काढलीच जात नसल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. तर आतापर्यंत ७०० ते ८०० कोटींची बिले महापालिकेने अदा केली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे पुढील दोन दिवसांत पालिकेने यावर ठोस निर्णय घेऊन बिले अदा करावीत, अन्यथा आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच महापालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषणही करण्याची तयारी त्यांनी केली आहे.

Web Title: Thane will be jammed from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.