ठाणेच शिवसेनेची एकहाती सत्ता आणेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:57 AM2018-02-06T02:57:25+5:302018-02-06T02:57:40+5:30

शिवसेनेच्या ५३ वर्षांच्या इतिहासात ठाणे जिल्हा परिषदेत प्रथमच शिवसेनेची सत्ता आली.

Thane will bring together the one-sided power of Shivsena | ठाणेच शिवसेनेची एकहाती सत्ता आणेल

ठाणेच शिवसेनेची एकहाती सत्ता आणेल

Next

ठाणे : शिवसेनेच्या ५३ वर्षांच्या इतिहासात ठाणे जिल्हा परिषदेत प्रथमच शिवसेनेची सत्ता आली. हा राज्याच्या दृष्टीने दिशा देणारा विजय असून येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सेनेची एकहाती सत्ता येईल व त्यामध्ये ठाण्याची महत्त्वाची भूमिका असेल, असा विश्वास ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नवनियुक्त नेते एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केला.
शिंदे यांची नेतेपदी निवड झाल्याबद्दल ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांच्या वतीने स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात नागरी सत्काराचे आयोजन केले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना शिंदे बोलत होते. शाखाप्रमुख ते शिवसेना नेतेपदापर्यंतच्या प्रवासातील खाचखळगे, अनुभव, संघटनेकरिता केलेले कष्ट, अन्य पक्षांतील नगरसेवकांची फोडाफोडी हा सारा पट शिवसैनिकांसमोर त्यांनी उलगडून दाखवला.
ठाण्यातील आतापर्यंतच्या यशाचे मानकरी शिवसैनिक असल्याचे सांगून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी हा सन्मान अर्पण करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे नेतेपदाचा मान ठाणे जिल्ह्याला मिळाला. धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिवसेना व ठाणे हे नाते गेल्या अनेक वर्षांपासून तयार झाले.
शिवसेनाप्रमुखांनी दिलेला प्रत्येक आदेश स्व. दिघे यांनी पाळला. त्यांनी केलेले काम टिकवण्याचे काम आपण करतोय.
ठाण्यातील शिवसेनावाढीचे काम त्यांनीच केले. एकटा एकनाथ शिंदे काहीच करू शकत नाही, असे ते म्हणाले.
>अखेर स्थापनेनंतर ५३ वर्षांनी जि.प.वर शिवसेनेचा भगवा
शिवसेना एकीकडे आणि इतर सर्व पक्ष एका बाजूला अशी परिस्थिती एका निवडणुकीच्या वेळी निर्माण झाली होती. अगदी महापौरांपासून सर्व पदे त्या पक्षांनी आपापसात वाटून घेतली होती. मोठ्या मुत्सद्देगिरीने एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत दोन नगरसेवकांना फोडण्यात यश आले आणि विजय खेचून आणला, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतच्या असामींच्या नजरा लागल्या होत्या. काही जण महाबळेश्वर येथून थेट गुजरातला जाणार होते. पण, जि.प. अध्यक्षपद खेचून आणले. जि.प.वर सत्ता आणण्याचे आनंद दिघे यांचे स्वप्न साकार झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडूनही या निवडणुकीबाबत विचारणा होत होती. अखेर, शिवसेनेच्या स्थापनेनंतर ५३ वर्षांनी जि.प.वर शिवसेनेचा भगवा फडकला.
>मातोश्रीचा हात पाठीशी
शिवसैनिक हीच पक्षाची खरी ताकद आहे. त्यामुळे त्याच्या अडचणींना धावून जा, असा सल्ला त्यांनी पदाधिकाºयांना दिला. अनेक संकटे आली, टीकाही झाली पण ‘मातोश्री’चा अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे यांचा हात पाठीशी असल्यामुळे आपण खंबीर राहिलो, असे शिंदे म्हणाले.
>प्रतिकूल परिस्थितीतही तेल, साखर, रॉकेलटंचाई विरुद्ध कसा लढा दिला, याचे स्मरण त्यांनी करून दिले. ट्रकचालकांच्या संपात पाच लाखांची रोकड देऊन १२ ट्रक भरून साखर ठाण्यात आणली होती. ती रोकड सोबत नेताना वारंवार न्याहाळत होतो, अशी आठवण त्यांनी सांगितली.

Web Title: Thane will bring together the one-sided power of Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.