ठाण्यात ७११ सार्वजनिक तर ३० हजार ३०४ घरगुती श्रींच्या मूर्तींचे होणार विसर्जन, ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्हीची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:44 PM2017-09-04T22:44:05+5:302017-09-04T22:44:26+5:30
ड्रोन कॅमेऱ्यांसह सीसीटीव्हीद्वारे विसर्जन घाटांवरील अगदी बारीक सारीक हालचालींवर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्यासह वरीष्ठ अधिकारी हे थेट पोलीस नियंत्रण कक्षातून करडी नजर ठेवणार आहेत.
ठाणे, दि. 4 - ड्रोन कॅमेऱ्यांसह सीसीटीव्हीद्वारे विसर्जन घाटांवरील अगदी बारीक सारीक हालचालींवर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्यासह वरीष्ठ अधिकारी हे थेट पोलीस नियंत्रण कक्षातून करडी नजर ठेवणार आहेत. ११२ विसर्जन ठिकाणी ७११ सार्वजनिक आणि ३० हजारांहून अधिक घरगुती गणेश विसर्जन मिरवणूका सुरक्षितपणे पार पडण्यासाठी राज्य राखीव दलासह शीघ्र कृती दलाच्या तुकडयाही तैनात करण्यात आल्या आहेत.
यंदा प्रथमच चोख आणि सुरळीतपणे विसर्जनाचे व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे शहर पोलीस विसर्जन घाटावरील सर्व हालचालींचे प्रक्षेपण ठाणे महापालिकेच्या सहकार्यातून उभारलेल्या सीसीटीव्हीद्वारे पाहणार आहेत. उपवन, रायलादेवी, मुंब्रा, कळवा, मासुंदा अशा मोक्याच्या ४० ते ५० ठिकाणी हे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच विसर्जन मार्ग आणि विसर्जन घाट याठिकाणी द्रोण कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. नियंत्रण कक्ष आणि अधिकाºयांच्या मोबाईलमध्ये विशेष अॅपची सुविधा करण्यात आली असून त्याद्वारे शहरातील अगदी कोणत्याही ठिकाणावरुन या विसर्जन मिरवणूकांची इथ्यंभूत माहिती पोलीस अधिकाऱ्यांची हातात मिळणार आहे.
कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच विसर्जन सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी वाहतूक मार्गांमध्येही विशेष बदल करण्यात आले आहेत.
असा आहे पोलीस फौजफाटा
संपूर्ण पोलीस आयुक्तालयातील गणेश विसर्जनासाठी बंदोबस्तासाठी ८ पोलीस उपायुक्त, १५ सहायक पोलीस आयुक्त, ११३ निरीक्षक, २९८ उपनिरीक्षक, ३२ महिला उपनिरीक्षक, तीन हजार ५०० कॉन्स्टेबल, ९०० महिला कॉन्स्टेबल, ५०० गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या आणि एक शीघ्र कृती दलाची कंपनी तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.