ठाण्यात जागोजागी बॅनर वॉर सुरू
By Admin | Published: February 2, 2017 03:13 AM2017-02-02T03:13:07+5:302017-02-02T03:13:07+5:30
ठाण्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वॉर सुरू असतानाच शहराच्या विविध भागांत परस्परांचे वाभाडे काढणारे बॅनर लावल्याने सगळ्यांच्याच नजरा ‘बॅनर वॉर’कडे
ठाणे : ठाण्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वॉर सुरू असतानाच शहराच्या विविध भागांत परस्परांचे वाभाडे काढणारे बॅनर लावल्याने सगळ्यांच्याच नजरा ‘बॅनर वॉर’कडे खिळल्या आहेत. यामध्ये शिवसेनेने ‘२५ वर्षांच्या विकासाची’, भाजपाने ‘सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी, भ्रष्टाचारमुक्ती’ अशा आशयाचे तर राष्ट्रवादीच्या वतीने ‘२५ वर्षे नाकर्तेपणाची’ आणि मनसेनेदेखील ‘मला भ्रष्टाचाराचा मार्ग मान्य नाही’, अशा आशयाचे बॅनर लावले
आहेत. त्यामुळे आता विविध
राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक वादाबरोबरच बॅनर वॉर भडकणार असल्याचे चित्र आहे.
ठाण्यात आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीचा माहोल तयार झाल्याचे दिसून येत आहे. मागील २५ वर्षे सत्तेत असलेले शिवसेना आणि भाजपा हे वेगळे झाल्याने ठाण्यात प्रथमच शिवसेना विरुद्ध भाजपा असे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाने आयोजित केलेल्या मेळाव्यात शिवसेना नेतृत्वाच्या थेट दाढीलाच हात घातला होता. तसेच २५ वर्षांतील भ्रष्टाचाराचीही आठवण करून दिली होती, तर शिवसेनेनेदेखील भाजपावर पलटवार करून तुमच्याकडील मोदी पण दाढीवाले आहेत, असा टोला लगावला होता.
विशेष म्हणजे यापूर्वी राष्ट्रवादीकडून तर शिवसेनेवर हल्ला सुरू होताच, त्यात आता भाजपाची आणि मनसेचीदेखील भर पडली आहे. एकूणच हे राजकीय डावपेच एवढ्यावरच थांबले नसून आता पुढील टप्पा बॅनरबाजीने सुरू झाला आहे. सध्या शहरातील घोडबंदर, हाय वे, हरिनिवास सर्कल, मुख्य
चौकांत लावण्यात आलेले विविध आशयांचे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. एकीकडे शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर ‘२५ वर्षे विश्वासाची, २५ वर्षे विकासाची’ असा उल्लेख करत केलेल्या कामांचे छायाचित्र लावले आहे. दुसरीकडे भाजपाने ‘देशातील सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी, भ्रष्टाचारमुक्ती’ याचे श्रेय घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (प्रतिनिधी)