Thane: खासगी डान्स पार्टीच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेस अटक
By जितेंद्र कालेकर | Published: October 22, 2023 08:36 PM2023-10-22T20:36:58+5:302023-10-22T20:37:22+5:30
Thane Crime News: - खासगी डान्स पार्टीमध्ये काम करणाऱ्या मुलींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - खासगी डान्स पार्टीमध्ये काम करणाऱ्या मुलींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तिच्या तावडीतून चार पिडित तरुणींची सुटका केल्याची माहिती गुन्हे शाखेने रविवारी दिली.
ठाणे शहर परिसरात तसेच वेगवेगळया ठिकाणी काही महिन्यांपासून डान्स शो, फोटोग्राफी, इव्हेंट शो आणि खासगी डान्स पार्टीमध्ये काम करणाऱ्या तरुणींना तसेच महिलांना ग्राहकांसोबत शरीर विक्रयासाठी मुंबई, लोणावळा, गोवा आणि दमण अशा ठिकाणी नेले जाते. अशा फूस लावलेल्या मुली सेक्स रॅकेटसाठी महिला दलालाकडूनच पुरविल्या जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रिती चव्हाण, जमादार श्रद्धा कदम, एन. डी. क्षीरसागर, डी. जे. भोसले, डी. व्ही. चव्हाण, डी. के. वालगुडे, डी. एस. मोहिते, हवालदार के. डी. पाटील आणि व्ही. एच. पांडव आदींच्या पथकाने १९ ऑक्टाेंबर रोजी कॅडबरी जंक्शनवरील सेवा रस्त्यावर असलेल्या एका मॉलमध्ये बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला. याच छाप्यात सेक्स रॅकेटसाठी आणलेल्या चार मुलींची महिला दलालाच्या तावडीतून सुटका करण्यात आली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात या दलाल महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका मुलीसाठी ७० हजारांचा सौदा
यातील एका मुलीसाठी ग्राहकाबरोबर ७० हजारांचा सौदा ठरला होता. त्यातील २० हजार रुपये पिडित मुलीला तर उर्वरित ५० हजारांची रक्कम ही दलाल महिला स्वत:साठी घेणार होती, अशी माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलेचे आणखी काेणी साथीदार आहेत का? याबाबतचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.