ठाण्यात मधुमेहाच्या आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 07:11 PM2019-06-13T19:11:25+5:302019-06-13T19:17:23+5:30
मधुमेहामुळे गेल्या काही दिवसांपासून हैराण झालेल्य पुष्पा बाळारामण या महिलेने १३ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या वर्तकनगर भागात गुरुवारी दुपारी घडली.
ठाणे: मधुमेहाच्या आजाराला कंटाळून पुष्पा बाळारामण (५९, रा. वर्तकनगर, ठाणे) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
वर्तकनगर जुन्या चाळीमध्ये राहणारी ही महिला गेल्या काही वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त आहे. तिचे पतीही आजारामुळे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांचे तळ अधिक एक मजली घर असून वरील मजल्यावर गुरुवारी दुपारी २ वा. च्या सुमारास तिने गळफास लावून आत्महत्या केली. काही कामानिमित्त शेजारील रहिवाशी बाळारामण यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी गेले, त्यावेळी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. पोलिसांच्या मदतीने शेजारच्यांनीच तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तिची दोन्ही मुले नोकरीनिमित्त अमेरिकेत आहेत. मुलांना तिच्या मृत्युची माहिती देण्यात आली असून ती आल्यानंतर त्यांच्या ताब्यात तिचा मृतदेह देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक ए. ए. शाह हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.