ठाण्यातील महिला पोलीस विनयभंग प्रकरण: निलंबित शिंदेंच्याविरुद्ध तक्रारी आणखी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 07:57 PM2018-02-12T19:57:53+5:302018-02-12T20:11:05+5:30
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील निलंबित राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी विनयभंग केल्याच्या दहा तक्रारी आल्याने पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे: ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील निलंबित राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याविरुद्ध आणखी पाच महिला पोलिसांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे यातील तक्रारदारांची संख्या दहावर गेली आहे. काही तांत्रिक कारणास्तव त्यांच्या अटकपूर्व जामीनाची सुनावणी आणखी दोन दिवस लांबणीवर पडली आहे.
शिंदे यांच्याविरुद्ध २४ जानेवारी २०१८ रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने पहिली तक्रार दाखल केली. त्यापाठोपाठ चार तक्रारी दाखल झाल्या. दरम्यानच्याच काळात विशाखा समितीनेही केलेल्या चौकशीत दहा महिलांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशाखा समितीच्या शिफारशीनुसार शिंदे यांना पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी निलंबित केले. पुरवणी तक्रारीमध्ये आणखी पाच महिलांनीही शिंदे यांनी केलेल्या मानसिक आणि लैंगिक छळवणूकीची तपास अधिका-यांना माहिती दिली. शिंदे यांना या प्रकरणात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला असून अटकपूर्व जामीनाची सुनावणीही १२ फेब्रुवारीला होणार होती. परंतू, या प्रकरणाची सुनावणी ज्या न्यायाधीशांकडे होती ते रजेवर असल्यामुळे ही सुनावणी आता १४ फेब्रुवारीपर्यत लांबणीवर पडली आहे. शिंदे यांना अटकपूर्व जामीन मिळू नये म्हणून ठाणे पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध भक्कमपणे बाजू मांडावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे यांनी यापूर्वीच केली आहे. विशाखा समितीच्या चौकशीमध्येही ज्या दहा महिलांनी शिंदे यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला होता. त्या सर्वच महिलांनी आता पोलीस ठाण्यातही येऊन पुरवणी जबाब नोंदविला आहे. मुख्यालयात नेमणूकीला असलेल्या महिला कर्मचा-यांशी डयूटीच्या निमित्ताने अश्लील संवाद साधणे, त्यांचा विनयभंग होईल असे वर्तन करणे तसेच लगट करण्याचा प्रयत्न करणे असे एकापेक्षा एक गंभीर आरोप या महिलांनी त्यांच्यावर केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला दिली. तक्रारींमध्ये वाढ झाल्यामुळे पोलीस वर्तूळातून या प्रकरणाची दबक्या आवाजात चांगलीच चर्चा रंगली आहे.