छोट्यांसह मोठ्यांनाही होतोय गालफुगीचा त्रास: आरामाबराेबरच तीन तासांनी मुखशुध्दी करा, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
By जितेंद्र कालेकर | Published: March 11, 2024 06:49 PM2024-03-11T18:49:37+5:302024-03-11T18:50:01+5:30
Thane Health News: वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य सांसर्गिक आजाराचा फैलावाची भीती असतांनाच लहानांसह माेठयांनाही गालफुगीचा (गालगुंड) त्रास सध्या सुरू झाला आहे. अशा रुग्णाला आठवडाभर या आजाराचा प्रादुर्भाव हाेताे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य सांसर्गिक आजाराचा फैलावाची भीती असतांनाच लहानांसह माेठयांनाही गालफुगीचा (गालगुंड) त्रास सध्या सुरू झाला आहे. अशा रुग्णाला आठवडाभर या आजाराचा प्रादुर्भाव हाेताे. असा त्रास झाल्यास रुग्णांनी जास्तीत जास्त घरातच आराम करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. एका पासून दुसऱ्याला गालफुगीची लागण होत असल्याने शिंकताना तसेच खोकतानाही काळजी घेण्याचे आवाहनही आराेग्य विभागाने केले आहे.
सकाळी गारवा आणि दुपारच्या वेळेत कडाक्याचा उष्मा असे विचित्र हवामान ठाणे शहरात पहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्दी, खोकला, ताप, डोळे येणे या बरोबर आता गालफुगीने डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून लहान मूलांसह प्राैढांनाही गालफुगीचा त्रास जाणवत आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रत्येक रुग्णांवर योग्य उपचार केले जात असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश बोरुळकर यांनी दिली.’
आहेत प्राथमिक लक्षणे-
गालफुगीच्या प्राथमिक लक्षणांमध्ये सर्दी, खोकला ताप यांचा समावेश आहे. लाळ ग्रंथीला, विषाणूजन्य संसर्गाने सूज, गालफूगी व गालदुखीचा त्रास होतो. साधारण आठवडाभर गालफुगीचा त्रास जाणवतो. त्यासाठी वेळीच जवळच्या वैद्यकीय तज्ज्ञाकडे उपचार घेणे गरजेचे आहे. या आजारात रुग्णाने किमान आठवडा भर घरातच आराम करण्याची गरज असल्याचेही डाॅ. बाेरुळकर यांनी सांगितले.
या रुग्णांनी घरीच, विलगीकरण करून आराम करावा. सर्वात महत्वाचे म्हणजे, " मौखिक स्वच्छःता," व पातळ आहार घ्यावा. मल्टीविटामीनस, विषेशतः " क" जीवनसत्वयुक्त फळे खावीत आणि तापासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे औषध घेणे. लहान बालकांना वयाच्या १२ ते १४, महिन्यात एमएमआर लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
- डॉ. प्रकाश बोरुळकर, बाल रोग तज्ज्ञ जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे
गालफुगी हा विषाणूने फैलवणारा संसर्गजन्य आजार आहे. हा विषाणू खोकणे, शिंकणे किंवा बोलण्याव्दारे शरीरात प्रवेश केल्याने, तोंडातील लाळग्रंथी सुजतात. गालफुगी रुग्णांनी घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावणे आवश्यक आहे. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावी. गालफुगीचा त्रास लहान मुलांना होण्याची अधिक शक्यता आहे. गालफुगीची लक्षणे असणाऱ्या मुलाला शाळेत पाठवू नये.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे