ठाणे जिल्हा परिषदेत सत्ताबदलाचे वारे ! शिवसेना करणार भाजपशी युती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 01:12 AM2019-05-11T01:12:59+5:302019-05-11T01:16:04+5:30
दीड वर्षांपासून ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीचा अनुभव आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर जिल्हा परिषदेत सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत.
- सुरेश लोखंडे
ठाणे - दीड वर्षांपासून ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीचा अनुभव आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर जिल्हा परिषदेत सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत. सत्तेतील राष्ट्रवादीला डच्चू देऊन शिवसेना भाजपशी युती करून जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तनाच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत.
राज्यात भाजप-शिवसेना युती असतानाही ठाणे जिल्हा परिषदेत ती झाली नाही. निवडणुकाही स्वबळावर लढलेल्या शिवसेनेने भाजपला चार हात लांब ठेवत राष्ट्रवादीला सोबत घेऊन जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली; मात्र लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केलेली अडवणूक शिवसेना-भाजपसाठी मोठीडोकेदुखी ठरली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला कोणत्याही सदस्याची तक्रार येऊ नये व त्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात निवडणुकीच्या कामात सहभाग घ्यावा, यासाठी आतापासून वातावरण निर्मिती करण्याची गरज लक्षात घेत, जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपला सहभागी करून घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.
लोकसभेच्या मतमोजणीनंतर, म्हणजे २३ मेनंतर या सत्ता बदलण्याच्या हालचाली उघडपणे होण्याची चर्चा सदस्यांमध्ये आहे. काही ज्येष्ठ सदस्यांनीदेखील या वृत्तास दुजोरा दिला आहे.
एवढेच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा एक लोकप्रतिनिधीदेखील शिवसेनेसोबत जाण्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेत शिवसेना भाजप युतीची सत्ता प्रस्थापीत करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादीचे उपाध्यक्षपद देणार भाजपला
शिवसेनेचे २६ आणि राष्ट्रवादीचे दहा अशा ३६ सदस्यांच्या जोरावर जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु, आता लवकरच जिल्हा परिषद अल्पमतात आणून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुका लादल्या जाण्याची शक्यता आहे. ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेत शिवसेना स्वत:च्या २६ सदस्यांसह भाजपचे १५ आणि एक अपक्ष अशा ४२ सदस्यांची मोट बांधून युतीची सत्ता आणण्याच्या प्रयत्नात आहे. अध्यक्षपदासह आताची सभापतीपदे शिवसेना आपल्याकडे कायम ठेवणार आहेत. राष्ट्रवादीकडील उपाध्यक्ष व विषय समितींची दोन सभापतींची पदे भाजपला देणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.