नूतन वर्षात ठाणे जिल्हा परिषदेचे कामकाज वागळे इस्टेट एमआयडीसीतून
By सुरेश लोखंडे | Published: December 10, 2023 07:08 PM2023-12-10T19:08:58+5:302023-12-10T19:09:12+5:30
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांची माहिती.
ठाणे: ठाणेजिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम सुरू करायचे असल्याने महिन्याभरात वागळे इस्टेट येथील भाड्याच्या इमारतीत जि. प.चे कार्यालय जात आहे. एमआयडीसीतील बंद कंपनीच्या तीन मजली इमारतीतून जिल्हा परिषदेचे कामकाज हाेणार असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांनी सांगितले.
गेल्या दाेन वर्षांपासून जिल्हा परिषदेची जीर्ण झालेली इमारत पाडलेली आहे. त्यामुळे या इमारतीमधील कार्यालय, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची दालने अन्यत्र हलवली आहेत. पण, आता या इमारतीदेखील पाडून या ठिकाणी भव्य टाॅवर उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सर्व कार्यालये वागळे इस्टेट राेड नंबर १६ येथील एक खासगी कंपनीच्या तीन मजली इमारतीत महिनाभरात हलविण्यात येत आहेत.
वागळे इस्टेटजवळील पासपाेर्ट ऑफिसच्या जवळ राेड नंबर १६ येथून महिनाभरात जिल्हा परिषदेच्या कार्यालयांचे कामकाज सुरू होईल, असे जिंदल यांनी सांगितले. ही २५ हजार चौरस फूट जागा भाड्याने घेतली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची दालने, सभा, बैठकांसाठी भव्य सभागृहे या इमारतीत असून, सुसज्ज पार्किंग व्यवस्थाही आहे. तब्बल तीन वर्षांसाठी भाड्याने घेतलेल्या या इमारतीमध्ये आगामी निवडून येणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवास व्यवस्था नाही.