ठाणे जिल्हा परिषदेत सत्ताधारी शिवसेनेमध्ये धुसफूस सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:44 AM2020-02-01T00:44:11+5:302020-02-01T00:44:21+5:30
जिल्हा परिषदेत शिवसेनेसह राष्टÑवादी आणि भाजपाची सत्ता आहे.
ठाणे : कल्याण ग्रामीणमध्ये तीव्र पाणीटंचाईमुळे शिवसेनेच्या खासदारांना गाडीतून उतरू दिले जात नसल्याच्या मुद्यासह गाव भरला मामाचा अन् कोणी नाही कामाचा, असा टोला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी शिवसेनेच्या सदस्यांनी आपल्याच सत्ताधाऱ्यांना मारल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात रंगली होती. यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांमध्ये आपापसांत धुसफूस सुरू असल्याचे उघड झाले आहे.
जिल्हा परिषदेत शिवसेनेसह राष्टÑवादी आणि भाजपाची सत्ता आहे. मात्र, गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांविरोधात शिवसेनेच्याच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कल्याण ग्रामीणमध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या तीव्र पाणीटंचाईचा मुद्दा चर्चेला आला असता, त्यावर सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनीच तोंडसुख घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची निरंकुश सत्ता जि.प.त आहे. या आघाडीत भाजपाचाही समावेश करण्यात आला. मात्र, सत्ताधारी शिवसेना सदस्यांचीच कामे अडकत असल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील पाणीटंचाईचा मुद्दा चर्चेत आल्यावर, कल्याण ग्रामीणमधील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यात आले. टंचाईमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. चक्क विद्यमान खासदारांनाच दौरा करताना गाडीतून उतरू दिले जात नसल्याचे वास्तव उघड करून जिल्हा परिषदेतील सत्ता काय कामाची, असा सवाल यावेळी शिवसेनेच्या नाराज सदस्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेच्या भिवंडीमधील एका ज्येष्ठ सदस्याने सत्ताधारी व प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. जिल्हा परिषदेत सत्ता असूनही अनेक प्रश्न रखडले आहेत. काही जणांना उगाचच महत्त्व दिले जाते. परंतु, त्याचा विकासकामांवर काहीही परिणाम झालेला नाही. गाव भरला मामाचा अन् कोणी नाही कामाचा, असा टोला मारून या सदस्याने आपल्याच सत्तेविरोधात विधान केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
शिवसेनेतील अस्वस्थता उघड : जिल्हा परिषदेत शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. केवळ एक सदस्य कमी असतानाही, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत निम्मा वाटा देण्यात आला. त्यानंतर, भाजपला एक सभापतीपद देण्यात आले. त्यामुळे पदांवरून वाद सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा जाधव व चौघा सभापतींना कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पायउतार व्हावे लागले. आता पुढील अडीच वर्षांत पुन्हा प्रस्थापितांच्याच नावांची चर्चा असल्यामुळे शिवसेनेच्या बहुतांशी सदस्यांमधून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळातही जिल्हा परिषदेत धुसफूस वाढण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.