महाआवास अभियानात ठाणे जिल्हा परिषद कोकण विभागात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:48 AM2021-09-04T04:48:30+5:302021-09-04T04:48:30+5:30
ठाणे : घरकुल बांधकामात पंतप्रधान आवास योजनेत प्रथम, तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत तृतीय क्रमांक ठाणे जिल्हा परिषदेने पटकवून ...
ठाणे : घरकुल बांधकामात पंतप्रधान आवास योजनेत प्रथम, तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत तृतीय क्रमांक ठाणे जिल्हा परिषदेने पटकवून अव्वल कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन कोकण विभाग महाआवास अभियान पुरस्काराने कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना शुक्रवारी नवी मुंबई येथे पार पडलेल्या समारंभात सन्मानित केले
घरकुल योजना गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या महाआवास अभियान काळात दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे जिल्हा परिषदेला कोकण विभागात पंतप्रधान आवास योजनेत प्रथम आणि राज्य पुरस्कृत योजनेत तृतीय क्रमांक मिळाला. याशिवाय भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिल्याने कल्याण तालुक्यास प्रथम क्रमांक व शहापूर तालुक्यास द्वितीय क्रमांक मिळाला आहे. कोकण विभागात तालुक्यांना मिळालेल्या पुरस्काराचा स्वीकार प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ, कल्याण तालुक्याचे नायब तहसीलदार विठ्ठल दळवी, शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, गटविकास अधिकारी अशोक भवारी, विस्तार अधिकारी रेखा बनसोडे, विस्तार अधिकारी संतोष पांडे यांनी केला.
......
जिल्ह्यात नऊ हजार ३७६ घरकुल पूर्ण
केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास योजनेमध्ये सहा हजार १८८ घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. यापैकी अभियान काळात ६४५ घरकुले पूर्ण झाली आहेत, तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेमध्ये तीन हजार १८८ घरकुले बांधली असून, अभियान कालावधीमध्ये ४१२ घरकुले पूर्ण करण्यात आली. म्हणजे जिल्ह्यात एकूण नऊ हजार ३७६ घरकुले पूर्ण केल्याची माहिती प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी दिली.
......
फोटो - कॅप्शन -
कोकण विभाग महाआवास अभियान पुरस्काराने विभागीय आयुक्त विलास पाटील, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना सन्मानित करण्यात आले.