ठाणे जि.प. अध्यक्षाची निवड २६ ऑगस्ट रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 02:29 AM2019-08-17T02:29:07+5:302019-08-17T02:29:23+5:30
ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांच्या रिक्त जागी निवडप्रक्रियेचे काम जिल्हा प्रशासनाने अखेर हाती घेतले आहे.
ठाणे : जिल्हा परिषदेच्या (जि.प.) अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांच्या रिक्त जागी निवडप्रक्रियेचे काम जिल्हा प्रशासनाने अखेर हाती घेतले आहे. २६ आॅगस्ट रोजी ही निवड केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्यांना पूर्वसूचना देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून नोटीस जारी केली आहे.
‘जि.प. अध्यक्ष निवड २६ आॅगस्टला’ या मथळ्याखाली लोकमतने ७ आॅगस्टला वृत्त प्रसिद्ध करून सदस्यांना निवडप्रक्रियेची जाणीव करून दिली आहे. मात्र, चार महिन्यांसाठी निवड प्रक्रिया लांबवण्यात येणार आल्याची चुकीची माहिती पसरल्यामुळे तर्कवितर्क काढले जात होते. अखेर, अध्यक्षपदाच्या या निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयानेदेखील सर्व सदस्यांना नोटीस बजावून इच्छुकांना उमेदवारी दाखल करण्याचे आवाहन केले आहे. येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ५३ सदस्यांना या निवडीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. मुरबाड पंचायत समितीच्या सभापतींची निवड १९ आॅगस्ट रोजी घेतली जाणार आहे. यासाठी मुरबाडचे तहसीलदार पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.
अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सदस्यांना बोट वर करुन मतदान करावे लागणार आहे. सहमती दर्शविणारा कौल ज्या सदस्याकडे जास्त आहे, त्यास अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित केले जाणार आहे. या प्रक्रियेनुसार नुकतीच शहापूर पंचायत समितीचे सभापती-उपसभापतीची निवड झाली आहे.