डबेवाल्यांना ठाणेकर बाईक रायडर्सचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:41 AM2021-08-15T04:41:00+5:302021-08-15T04:41:00+5:30
ठाणे : कोरोनाच्या काळात मुंबईच्या डबेवाल्यांना मोठा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना मदत करण्यासाठी ठाण्यातील तरुणाई सरसावली आहे. ...
ठाणे : कोरोनाच्या काळात मुंबईच्या डबेवाल्यांना मोठा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना मदत करण्यासाठी ठाण्यातील तरुणाई सरसावली आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून द मिस्टिक वंडरर्स या ग्रुपचे बाईक रायडर्स रविवारी मुंबईच्या डबेवाल्यांना आर्थिक मदत करणार आहेत.
द मिस्टिक वंडरर्स ही ठाण्यातील बाईक रायडर्सची संस्था आहे. या संस्थेने यंदा राईड न करता कोरोना काळात बेरोजगार झालेल्या डबेवाल्यांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. यावेळी ते रायडिंगचा निधी आणि संस्थेच्या सदस्य आणि हितचिंतकांकडून आलेली मदत एकत्र करून ४२ हजार रुपये दादर येथील डबेवाल्यांच्या संस्थेला देणार आहेत. ही संस्था डबेवाल्यांला आवश्यक ती मदत देणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर मोहिते याने सांगितले. मुंबईत पाच हजार डबेवाले असून त्यापैकी १०० डबेवाल्यांच्या हाताला काम असल्याची माहिती सागरने दिली. २०१८ पासून हे रायडर्स महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर रायडिंगसाठी जातात. या संस्थेचे ८५ सदस्य नोंदणीकृत आहेत.